
बेकारीचे अत्यंत भयंकर चित्र पुण्यात पाहायला मिळाले. पोलीस दलातील 531 जागांच्या भरतीसाठी आज पहाटे येथील पोलीस मुख्यालयाजवळ सुमारे चार हजार लाडक्या लेकींची गर्दी उसळली. यावेळी रेटारेटी, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात मुख्यालयाचे गेट तुटल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात अनेक मुली जखमी झाल्या असून काहींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी मात्र कुणीही जखमी झाले नसल्याचा दावा केला.
n शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आज कारागृह महिला पोलीस भरतीसाठी उमेदवारांची परीक्षा होणार होती. त्यासाठी चार हजार महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते.
n पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास गेटजवळ मोठी गर्दी झाली. मात्र तिथे पुरेशी व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाला. त्यात रेटारेटीमुळे लोखंडी गेट तुटून स्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
n गेट तुटल्यानंतर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. धक्काबुक्की करत मुलींनी प्रवेश केला. त्यात अनेक जणींना दुखापत झाली आहे. काहींच्या पायाला गंभीर इजा झाली.
पोलीस–पालकांत बाचाबाची
या मुली अनेक महिन्यांपासून या भरतीची तयारी करत होत्या. आपली लेक खाकी वर्दीत पाहण्याचे पालकांचे स्वप्न आहे. मात्र दोन वर्षांपासून भरती रखडत आहे. त्यात मुलींना बोलावून कोणतीच व्यवस्था केली नसल्याने पालक संतप्त झाले. पालक आणि पोलिसांत खटके उडाले.