एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी एसटी वाहकाने कळंब शहारात आमरण उपोषण सुरु केले आहे. सच्चिदानंद पुरी असे उपोषणकर्त्या एसटी वाहकाचे नाव आहे. शहरातील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून पुरी यांचे उपोषण सुरु आहे.
कळंब येथील बस आगारात सच्चिदानंद पुरी हे वाहक म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी विलगीकरणाच्या मुद्यावरुन झालेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. तसेच दोन वर्षापूर्वी एसटी महामंडळ शासनात विलीन करावे या मागणीसाठी राज्यभर संप पुकारण्यात आला होता. या संपा दरम्यान देखील हा कर्मचारी गळ्यात फास अडकवून झाडावर चढला होता. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी वारंवार पुढे येत आहे. अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. हताश झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारातील सच्चिदानंद पुरी यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे सच्चिदानंद पुरी हा बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या मागील बाजूने आत आला आणि टॉकर चढला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राम चाटे, पोलीस कर्मचारी युवराज चेडे, मायंदे, आगारातील कर्मचाऱ्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुरी हे मागण्यावर ठाम आहेत.