एसटी कर्मचाऱयांच्या समस्या मार्गी लागणार, 15 जुलैपासून आगारात ‘कामगार पालक दिन’

रजा, बदली, डय़ुटी अशा स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱयांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ‘कामगार पालक दिन’ घ्यावा. कर्मचाऱयांच्या समस्या ऐकून घेऊन तिथेच तातडीने निराकरण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटीच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार 15 जुलैपासून दुपारी 3 ते 5 या वेळेत ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळात सध्या सुमारे 90 हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. स्थानिक पातळीवर चालक-वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांना रजा, डय़ुटी, वेळापत्रकातील त्रृटी, बदल्या, बढत्या, वरिष्ठांची कार्यपद्धती, विश्रामगृह, तेथील स्वच्छता या बाबतीत अनेक तक्रारीवजा समस्या असतात. या तक्रारी आपल्या वरिष्ठांनी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. कर्मचाऱयांचे अनेक किरकोळ प्रश्न केवळ योग्य अधिकाऱयांपर्यंत न पोहोचल्याने अनुत्तीर्ण राहतात. यावर उपाययोजना म्हणून विभाग नियंत्रकांनी त्यांचे ‘पालक’ बनून त्यांच्या समस्या ऐकून तातडीने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा हा ‘कामगार पालक दिना’चा मुख्य उद्देश आहे.