कोकणात होळी आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जातात. कोकणात जाताना मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेमुळे दरवर्ष चाकरमान्यांचे हाल होतात. तसेच रेल्वे आणि एसटीचे आरक्षणही फुल्ल होते. आता चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी एसटी सज्ज असून देवगड आगारातील 35 एसटी फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
गौरी गणपती सणानिमित्त कोकणात आलेल्या मुंबईकर चाकरमानी व गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाकरिता देवगड आगार सज्ज झाले आहे. देवगड आगारातून बोरीवली, मुंबई सेंट्रल ,विठ्ठल वाडी, कुर्ला नेहरू नगर, नालासोपारा, या मार्गावर 35 प्रवासी फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत या परतीच्या प्रवासी फेऱ्या मुंबईकर चाकरमानी व गणेश भक्तांना घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत .या व्यतिरिक्त देवगड आगाराची देवगड बोरिवली ही शयनासनी प्रवासी फेरी देखील नियमित प्रवासी वर्गाला सेवा देणार आहेत. या प्रवासी फेरीला कायम चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परतीच्या प्रवासाकरीता देवगड आगारातून 12 ते 16 सप्टेंबर या कालावधीत एकूण 20 जादा प्रवासी फेऱ्यांचे आरक्षण झाले असून देवगड मुंबई मार्गावर 6 जादा प्रवासी फेऱ्या, देवगड विठ्ठलवाडी मार्गावर 2 प्रवासी फेऱ्या, देवगड कुर्ला नेहरू नगर मार्गावर 6 प्रवासी फेऱ्या व देवगड नालासोपारा मार्गावर 1 प्रवासी फेरीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या व्यतिरिक्त देवगड आगारातून 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी नियमित सोडण्यात आली आहे. सर्वाधिक जादा प्रवासी फेऱ्यांचे आरक्षण बोरिवली मार्गावर 14 सप्टेंबर रोजी 9 प्रवासी फेऱ्या देवगड मुंबई मार्गावर 3, विठ्ठलवाडी 1 याप्रमाणे गाड्यांचे आरक्षण झाले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित प्रवासी फेऱ्या या 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत पुरविण्यात येणार आहे.