
उन्हाळ्यात बच्चेकंपनीपासून सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीत वेध लागले आहेत ते मामाच्या गावाला जायचे. आता ‘लालपरी’तून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीच्या रायगड विभागातून 16 जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जादा बसेस 15 जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी कमी खर्चात गोरगरीब व मध्यमवर्गीयांना एन्जॉय करता येणार आहे.
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीच्या रायगड विभागातून जादा बसेस कोकणासह राज्याच्या विविध भागात सोडल्या जाणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव, महाड या सात आगारातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त 16 जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटीच्या या निर्णयामुळे लहान मुलांना मामाच्या गावाला तर जाता येईलच, पण पर्यटनाचादेखील आनंद लुटता येणार आहे. त्यादृष्टीने रायगड विभागाने वेळापत्रक तयार केले असून 15 जूनपर्यंत जादा गाड्या सोडण्यात येतील. त्याचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे.
अशा गाड्या सुटणार
अलिबाग-बार्शीमार्गे अहमदपूर, अलिबाग-कल्याणमार्गे जळगाव, श्रीवर्धन ताम्हीणीमार्गे तुळजापूर, श्रीवर्धन-कल्याणमार्गे शिर्डी, हरीहरेश्वर-स्वारगेटमार्गे अक्कलकोट, श्रीवर्धन-अहिल्यानगरमार्गे छत्रपती संभाजीनगर, कर्जत-वाशीमार्गे तुळजापूर, रोहा-माणगाव-बार्शीमार्गे लातूर, रोहा-माणगावमार्गे धाराशिव, रोहा-पाली-अहिल्यानगरमार्गे बीड, मुरुड-खोपोलीमार्गे छत्रपती संभाजीनगर, मुरुड-खोपोली-बार्शीमार्गे लातूर, माणगाव-बार्शीमार्गे अहमदपूर, महाड-बोरिवली, श्रीवर्धन-बोर्लीमार्गे नालासोपारा अशा फेऱ्या वेगवेगळ्या वेळेनुसार धावणार आहेत.