खोके सरकारच्या बॅण्डिंगसाठी विद्यार्थ्यांच्या एसटी बसेस पळवल्या

निवडणुकांवर डोळा ठेवून मिंधे सरकारने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली स्वतःचे ब्रेण्डिग करण्याचा सपाटा लावला आहे. यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माणगाव येथील कार्यक्रमाकरिता एसटी बसेस अक्षरशः ‘पळवण्यात’ आल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणच्या बस स्थानकांवर प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा प्रचंड खोळंबा झाला. महाडच्या बस डेपोमध्ये तर तुफान गर्दी झाली होती. प्रशासनाच्या या मिंधे कारभाराविरोधात माहिती मिळताच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे धडक देत आगारप्रमुखांना फैलावर धरले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माणगाव येथे आज ‘लाडकी बहीण’ योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याकरिता जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून एसटी बसेस उपलब्ध करून त्यातून नागरिकांना माणगावमध्ये आणण्यात आले. महाड एसटी आगारातूनदेखील अशाच गाड्या या कार्यक्रमाकरिता वळवण्यात आल्या. परंतु हे करताना प्रशासनाने कोणतेही नियोजन न केल्याने महाडमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. महाड आगारात तालुक्यातून आलेले प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी गाड्याच नव्हत्या. तासन्तास थांबूनदेखील एसटी न मिळाल्याने या बस स्थानकात तुफान गर्दी झाली. याबाबत माहिती मिळताच युवासेनेचे दक्षिण रायगड जिल्हा युवाधिकारी बंटी पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी बस आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांना फैलावर धरले.

तर तीव्र आंदोलन करू

युवासेनेच्या दणक्यानंतर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र याबाबत पेण येथील विभागीय कार्यालयात रितसर तक्रार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांची नित्याचीच होत असलेली उपेक्षा जर थांबली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा बंटी पोटफोडे यांनी दिला.