सर्वसामान्यांचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही भाडेवाढ लागू होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून दोन्ही वाहनांच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे एसटी बसने लांब पल्ल्याचा आणि रिक्षा किंवा टॅक्सीने जवळचा प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
भाडेवाढीच्या वृत्ताला परिवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाची गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एसटीसोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ प्रत्येक वर्षी होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित 14.97 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. ही भाडेवाढ आजपासूनच लागू होईल. यासह रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.
दरम्यान, आगामी काळामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा होत आहेत. त्याआधी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने गावखेड्यातून परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे 23 वरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 वरून 31 रुपये होणार आहे.