ठाणे शहरातील अपघातांच्या मालिका संपण्याचे काही नावच घेत नाहीत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली आहे. या अपघातात 11 जण जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना तातडीने ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर सोमवारी रात्री महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला. यावेळी बसने थेट मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात 11 जण जखमी झाले आहेत. मात्र हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर एसटी बस थेट दुभाजकावर चढली. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशने जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला.