दापोली तालुक्यातील दाभोळ येथून मंडणगड मार्गे मुंबईत प्रवासी घेऊन निघालेल्या एस टी बसला मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणाजवळ अपघात झाला. या अपघातात एसटी बस 15 फूट खोल दरीत कोसळून पलटी झाली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. तर काही प्रवाशांना गंभीर इजा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगाराची दाभोळ-मुंबई ही बस रात्री पावणे अकरा वाजता दापोली येथून मुंबई सेंट्रल येथे प्रवासी घेऊन निघाली होती. बस मंडणगड तालुका हद्दीत चिंचाळी धरणाजवळ आली असता बस 15 फूट खोल दरीत कोसळून बस पलटी झाली या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या 41 प्रवाशांपैकी 30 प्रवासी हे जखमी झाले आहेत. तसेच उर्वरित प्रवाशांना मुकामार बसला आहे. सदर घटना रविवारी मध्यरात्री 12.55 च्या दरम्यान घडली आहे. सोमवारी सकाळी बसला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मंडणगड आगाराचे व्यवस्थापक म.ब.जुनेदी आणि दोपाली आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी घटनास्थळी जावून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटनेचा अधिक तपास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.