
कार आणि एसटीची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटात घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात कारमधील दोन जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.
पुण्याच्या दिशेकडे निघालेली खेड-चिंचवड ही एसटी बस ताम्हिणी घाटात रेस्ट हाऊसजवळ समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने तिला जोरदार धडक दिली. घाटातील उतार आणि अतिवेग यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. कारला एका बाजूने जोरदार धडक बसल्याने कारचालक व त्याच्या मागे बसलेल्या एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
दोन तास वाहतूककोडी
मंगळवारी दुपारी ताम्हिणी घाटात कार व एसटी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी बचाव दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तब्बल दोन तास प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात पोलिसांना यश मिळाले. दरम्यान घाटातील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती.