ब्रेक फेल बसमधील प्रवाशांनी उड्या मारून टायरखाली दगड टाकून गाडी थांबवली, 40 जणांचा जीव वाचला

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त गाड्या प्रवाशांच्या मुळावर उठत आहेत. याचा प्रत्यय  पोलादपूर तालुक्यात आला. ओंबळी गावातील उतारावर धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला. चालकाने ब्रेक फेल झाल्याचे ओरडून सांगताच सर्वांची बोबडी वळली. बसचा वेग कमी असल्याने काही धाडसी प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या आणि बसच्या चाकाखाली दगड टाकले. सुदैवाने एका चाकात दगड अडकला आणि बस थांबली. यामुळे ४० प्रवाशांचा जीव वाचला. पाच मिनिटांचा हा थरार प्रवाशांच्या जीवन-मृत्यूच्या पाठशिवणीचा खेळ ठरला.

ग्रामीण भागात गळके छत, तुटके दरवाजे-खिडक्या, झिजलेले टायर अशा बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. नादुरुस्त गाड्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. आज सकाळी ओंबळी- पोलादपूर पैठण गावामध्ये येत असताना बसचे ब्रेक फेल झाले. बसमध्ये ४० प्रवासी होते. यामध्ये शाळकरी मुले, वयोवृद्ध तसेच महिलांची संख्या मोठी संख्या होती.

चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः तो ब्रेकवर उभा राहिला. मात्र बस थांबत नसल्याने चालकाने मोठ्याने ओरडून ब्रेक फेल झाल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे सर्वांची घाबरगुंडी उडाली. याही अवस्थेत काही धाडसी प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. रस्त्याकडील मोठमोठे दगड चाकाखाली टाकून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. जवळपास पाच मिनिटे हा थरार सुरू होता. एक दगड टायरमध्ये अडकल्यानंतर 100 फुटांवर जाऊन गाडी रस्त्याच्या बाजूला घसरून थांबली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

गाडी नादुरुस्त सांगूनही आगारप्रमुखाने ऐकले नाही 

चालकाच्या ताब्यात गाडी दिल्यानंतर स्टेअरिंगवर बसताच गाडी नादुरुस्त असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ कार्यशाळा प्रमुख आणि आगारप्रमुखांना सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी काहीच ऐकले नाही. हीच गाडी चालवावी लागेल अशी तंबी चालकाला दिली. त्यामुळे नाइलाजाने गाडी प्रवासी मार्गावर आणावी लागली. मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप वाचले. दरम्यान नादुरुस्त गाड्या भंगारात काढून नवीन बस देण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. आठ दिवसांत यामध्ये सुधारणा झाली नाही तर पोलादपूर बस स्थानकातून एकही गाडी बाहेर सोडणार नाही, असा इशारा प्रवाशांनी दिला.