>> राजेश प्रधान
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेली एसटी खेडोपाडी प्रवाशांना सेवा देत आहे. मात्र हीच एसटी लांबपल्ल्याच्या ठिकाणाला निघाली की परिवहनच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. याआधी फक्त मान्यताप्राप्त उपाहारगृहावर एसटी नाश्ता व जेवणासाठी थांबवली जायची. मात्र आता एसटी प्रशासनाने खासगी हॉटेल्स व ढाब्यांवर एसटीला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने स्टॅण्डवरच्या कॅण्टीनमध्ये सन्नाटा पसरला आहे. परिवहनच्या या निर्णयाने खासगी हॉटेल्सची चंगळ झाली असली तरी चढ्या भावाने खाद्यपदार्थ विकले जात असल्याने प्रवाशांची लूट होत आहे.
एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात, परंतु एसटी महामंडळाने पेण तालुक्यातील हॉटेल रायगड पॅलेस, मिलन हॉटेल तरणखोप, शालिमार हॉटेल गडब या महामार्गावरील हॉटेल्सवर एसटी थांबवण्याची परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या अल्पोपाहार केंद्रावर गाडी थांबत नसल्याने या केंद्रांवर आता सन्नाटा दिसू लागला आहे, तर खासगी हॉटेल्सची चंगळ दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व ढाबे मालकांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे पुन्हा ढाब्यांवर एसटी थांबविण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांवर अन्याय केला.
ग्राहक नसल्याने दुकानांना टाळे पेण येथील रामवाडी एसटी डेपोत असलेल्या कॅण्टीनला 1 लाख 10 हजार रुपये भाडे आहे. एका जनरल स्टोअरला सुमारे 20 हजार तर दुसऱ्या स्टोअरला 12 हजार, फुट स्टॉलला 40 हजार, चिक्की स्टॉलला 20 हजार, झुणका-भाकर केंद्राला 75 हजार असे भाडे आहेत. येथे आठ फेरीवाले विक्रेते होते. त्यांच्याकडूनही हजारो रुपये एसटी महामंडळ आकारत होती. त्यापैकी चार फेरीवाल्यांनी ग्राहक नसल्याने आपला व्यवसाय बंद केला आहे.
केवळ 135 रुपयांसाठी एसटी खासगी ढाब्यांवर एसटी महामंडळाला विविध मार्गाने उत्पन्न मिळत असतानादेखील एसटी प्रशासनाने केवळ 135 रुपये प्रति एसटी या दराने एसटी गाड्यांना खासगी हॉटेल ढाब्यांवर थांबण्याची परवानगी दिली आहे. हीच रक्कम शिवशाहीसाठी 180 रुपये आहे. त्यामुळे एसटी स्थानकामधील अधिकृत व्यावसायिकांना ग्राहक मिळत नसल्याने दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.