
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. पण परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जालन्यात सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाला हरताळ फासला गेल्याची चर्चा आहे. जालन्यातील बदनापूर शहरात जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. बदनापूर तालुक्यात किंवा तिथल्या केंद्रावर पेपरफुटीचा असा कोणाताही प्रकार झालेला नाही, असे जिल्हाधिकारी पांचाळ म्हणाले आहे.
पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्या. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा प्रकार बदनापूरमध्ये घडल्याचे बोलले जात आहे. पेपर फुटल्याचे वृत्त पसरताच शिक्षणाधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून बसले. संबंधितांकडून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाळेच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याची चर्चा आहे. त्यासह मंठा तालुक्यातील तळणी परीक्षा केंद्रांवरही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर तपासणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. आता शिक्षण विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर कारवाई होणार
परीक्षा केंद्रावरती सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. याबाबत परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्याकडे माहिती मागवली असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. दोषींवर विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी सांगितले. दरम्यान, बदनापूरमधील पेपरफुटीच्या चर्चांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सष्टीकरण दिले आहे.
पेपरफुटीचा कोणताही प्रकार झालेला नाही- जिल्हाधिकारी
दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका तयार करून देण्यात आली अशी, बातमी माध्यमांकडून दिली गेली. त्या बातमीत तथ्य नाही. याबाबत तपासणी करण्यात आली. व्हॉट्सअॅपवर जे सर्क्युलेट करण्यात आलं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही. अशा पद्धतीची कोणतीही घटना तिथे घडलेली नाही. तिथे एक-दोन पालकांनी दगड फेकले होते. त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जालन्यामध्ये सर्वच केंद्रांवर कडक बंदोबस्त आणि परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बंदोबस्त करण्यात येत आहे. पेपरफुटीचा कोणताही प्रकार केंद्रावरती किंवा तालुक्यात झालेला नाही.
– डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना