वारसावैभव – महेश्वरच्या अहिल्याबाई!

>> सर्वेश फडणवीस

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं.

होळकर घरातल्या तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे अहिल्याबाईंना आता इंदूरला होळकर वाडय़ात राहणे नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला. नेमाडमध्ये नर्मदेच्या काठी पुराणात ज्याचे वर्णन मर्दाना या नावाने आले आहे. ते स्थान त्यांच्या पसंतीस उतरले. परंतु ज्योतिषी मंडळीचे म्हणणे पडले की, हे स्थान राजधानीसाठी योग्य नाही. त्या पुढे निघाल्या. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या. नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र, दाट झाडी, भुईकोट किल्ला आणि मल्हारराव होळकरांनीच काही वर्षांपूर्वी महेश्वर वसविले होते. ज्योतिषी, ब्राह्मण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले.

प्राचीन साहित्यात महेश्वरचा उल्लेख माहिष्मती म्हणून आहे. रामायण, महाभारत, पुराणे, बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख होता. हरिवंशात म्हटले होते, महिष्मान नावाच्या राजाने या नगरीची उभारणी केली. पुराणातील प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याने ज्या अनुप देशावर राज्य केले, त्या अनुप देशाची राजधानी हीच होती. या नगरीस ‘सहस्रबाहू की वस्ती’ असेही संबोधले जात असे. वाल्मीकी रामायणात म्हटले होते की, लंकापती रावण सहस्रबाहुच्या राजधानीत आला असता त्याने आपल्या बाहुबळाने नर्मदेचा प्रवाह कोंडून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या बाहूतून निसटून नर्मदेचा प्रवाह सहस्रधारांनी बाहेर पडला आणि वाहू लागला. कालिदासाने रघुवंशात माहिष्मती व नर्मदा यांचा उल्लेख केला आहे. जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा विख्यात शास्त्रार्थ याच नगरीत झाला होता. मंडनमिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. पौराणिक काळाप्रमाणे ऐतिहासिक काळात हे नगर महत्त्वाचे होते. सुप्रसिद्ध हैहय वंशी राजांचे राज्य येथेच होते. चालुक्य परंपरांच्या काळातही महेश्वर ही एक प्रसिद्ध नगरी होती. नंतर मांडूच्या सुलतानांनी ती जिंकून घेतली. इ.स. 1422 मध्ये ती गुजरातच्या सुलतान अहमदशहाने तत्कालीन हुशंगाबादकडून अर्थात आताचे नर्मदापुरम जिंकली. अकबराच्या काळातही महेश्वर हे एक प्रसिद्ध स्थान होते. यातील बराचसा इतिहास अहिल्याबाईंना माहिती होता.

इ.स. 1730 च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर आपल्या अधिपत्याखाली आणले. या नगरीचे महत्त्व जाणून मल्हाररावांनी 1745 मध्ये एक राजाज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसविण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वाही फिरवली. महेश्वरची परंपरा अहिल्याबाईंच्या प्रकृतीला भावणारी होती. किंबहुना त्यांच्या अंतःप्रेरणेला या नगरीने साद घातली होती. शिवाय त्यांची राज्य कारभार करणारी व्यवहारी वस्तुनिष्ठ नजर त्यांना सांगत होती, येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. राज्य कारभारासाठी सुरक्षित. होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी महेश्वर हे गाव स्वतःला राहण्यासाठी म्हणून निश्चित केले. किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आत एक साधाच वाडा बांधला गेला. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वर किल्ल्याच्या आत राहू लागल्या. तेथून नर्मदेचे दर्शन स्पष्टपणे घडत होते. घरात राजदरबाराचीही जागा होती. येथेच प्रमुख कारभाऱयांसमवेत अहिल्याबाईंचा दरबार भरू लागला. त्या पांढऱया घोंगडीवर बसत असत. या घराच्या एका भागात एक मंदिर होते. त्यात शिवलिंगे होती. इतर देवदेवतांच्या मूर्तीही होत्या. याच ठिकाणी अहिल्याबाई नेहमी पूजा करत असत. अहिल्याबाई कायमच्या महेश्वर-निवासिनी झाल्या. मग मंदिरांच्या अंगणांतून होमहवनांचा पवित्र धूर भोवताली पसरू लागला. ग्रंथपठणाचे, मंत्रजागराचे गंभीर स्वर वातावरणात घुमू लागले. भजन-कीर्तनाचा आणि टाळ-मृदंगाचा घोष नर्मदेच्या तटावर सतत निनादत होता.

महेश्वरहून अहिल्याबाई राज्य कारभार पाहू लागल्या. होळकर म्हणजे शिंदे आणि पेशव्यांचे दोन नेत्रच असे म्हटले जात होते. अहिल्याबाई सत्तेवर आल्या तेव्हा, घरातील कुटुंबात जवळची रक्ताच्या नात्याची माणसे बोटांवर मोजण्याइतकीच होती. अहिल्याबाईंनी ज्या क्षणी महेश्वर दरबारात कार्य हाती घेतले त्यावेळी देवा-ब्राह्मणांसमक्ष पत्र ठेवले आणि मनोमनी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा महेश्वरच्या वाडय़ावर आजही लिहिलेली आहे.

“माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत जबाबदार आहे.
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱया माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.”

महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला. आजही महेश्वरच्या कणाकणात अहिल्याबाईंचा वास आहे हे सतत जाणवतं. कितीदा अनुभवले महेश्वर, पण ही भावना मनात आजही कायम आहे. स्त्राr पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे.

[email protected]