लिफ्ट दिली, मैत्री झाली अन् काही तासांत खून! नांदुर येथील तरुणाच्या खुनाचा श्रीरामपूर पोलिसांकडून उलगडा

राहाता तालुकाहद्दीत असणाऱया नांदुर येथील तलावाजवळ आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे रहस्य अखेर उलगडले. ऍपे चालकाकडे लिफ्ट घेतल्यानंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर काही कारणाने दोघांमध्ये बिनसले आणि काही वेळातच ऍपे चालकाने त्याचा खेळ संपविल्याचे उघड झाले आहे.

शुक्रवारी (4 रोजी) सायंकाळी नांदुर येथील तळ्याजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. नीतेश आदिनाथ मैलारे असे त्याचे नाव असून, तो नांदेड जिह्यातील मुखेड तालुक्यातील पोखंडेवाडी येथील असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, राहाता तालुक्यातील केलवड येथील ऍपे चालक ऋषिकेश देवण्ण्या बरबट (वय 25) याने खून केल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेतले असता, त्याने खुनाची कबुली दिली.

नीतेश मैलारे हा छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे निघाला होता. तो गाडीची वाट पाहत असताना ऋषिकेश बरबट याने त्याला लिफ्ट दिली. यावेळी दोघांमध्ये चांगली चर्चा रंगली. दोघांची चांगली ओळख झाल्याने दोघे रस्त्यात थांबून एकत्र दारू प्यायले. नेवाशाजवळ पुन्हा एकदा दोघे एका हॉटेलमध्ये दारू प्यायले. ऍपेमध्ये दोघे गप्पा मारत होते. श्रीरामपूरजवळ आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये गाडीतच भांडण सुरू झाले. श्रीरामपूरच्या पुढे गेल्यावर ऋषिकेशने गाडीतील टॉमी काढून नीतेशवर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या नीतेशला रस्त्यात टाकून बरबट घरी निघून गेला, अशी माहिती बरबट याने दिली.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी कोणताही पुरावा नसताना अत्यंत शिताफीने तपास करून या खूनप्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले.