सृजन संवाद – रामराज्यातले व्यवस्थापन

>> डॉ. समिरा गुजर जोशी

आपण अयोध्या कांडातील 100 व्या सर्गात असलेल्या राम – भरत संवादाविषयी मागील लेखात जाणून घेतले होते. हा सर्ग ‘कद्चित सर्ग’ म्हणूनही ओळखला जातो. कारण श्रीरामांनी भरताला कुशल विचारीत असताना प्रत्येक प्रश्नाची सुरुवात ‘कद्चित’ (म्हणजे ‘असे आहे का?’) या शब्दाने होते. राजधर्म अर्थात राजाची कर्तव्ये जाणून घ्यायची असतील तर या सर्गाचा बारकाईने अभ्यास करायला हवा असे अनेक महत्त्वाचे मुद्दे इथे मांडण्यात आले आहेत. आजच्या काळातील नेता असू दे किंवा एखाद्या कंपनीचा सीईओ त्याला या विषयाचे मार्गदर्शन आजही महत्त्वाचे ठरावे. सैन्य हे राज्याच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे यात शंका नाही. सैन्य पोटावर चालते असे आपल्याकडे म्हटले जाते. या वस्तुस्थितीचे भान करून देत असताना राम भरताला सांगतो, ‘‘सैनिकांना द्यायचे पगार व भत्ते वेळेवर आणि पुरेसे देतोस ना?’’ हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे हे वेगळे सांगायला नको. यात यथोचित म्हणजे पुरेसा आणि संप्राप्त काल म्हणजे वेळच्या वेळी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

सैन्यामध्ये रोष असणे हे कोणत्याच सत्तेला परवडणारे नाही (हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य युद्धातही याचे दाखले आपल्याला सापडतात). सैन्य राजावर नाराज होण्याचे एक प्रमुख कारण ठरू शकते ते म्हणजे पगार वेळेवर न होणे आणि पुरेसा पगार नसणे. कोणत्याही कंपनीच्या यशासाठीदेखील कर्मचाऱयांची निष्ठा संपादन करायची असते, हा मुद्दा प्रभावी ठरतो. ‘‘काम जास्त पडते, पण महिन्याच्या पाच तारखेला चोख पगार बँकेत जमा होतो.’’ असे असेल तर लोक थोडे जास्तीचे कामही आनंदाने करतात हा आपला अनुभव आहेच. या ठिकाणी रामाच्या तोंडी पुन्हा एकदा अयोध्येचे वर्णन येते. ती एक विशाल नगरी आहे हे सांगून राम विचारतो की, आजही ती ‘समाजोत्सवशोभित’ आहे ना? सामाजिक उत्सव ही गोष्ट केवळ करमणुकीसाठी नसतात. त्यातून त्या राज्याचे आरोग्य जणू कळत असते. जो समाज आर्थिकदृष्टय़ा संपन्न आहे, सुरक्षित आहे, संघटित आहे आणि सांस्कृतिकदृष्टय़ा विकसित आणि जागरूक आहे, तो सामाजिक उत्सवांमध्ये सहभागी होतो. तेव्हा वेळोवेळी होणारे हे उत्सव आणि त्यात सहभागी होण्याचा लोकांचा उत्साह याचे महत्त्व ओळखले पाहिजे. याचप्रमाणे आपला नेता लोकांना दिसणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. राम विचारतो, ‘‘भरता, रोज सकाळी लवकर अयोध्येतील राजपथावर जाऊन तू मोकळेपणाने लोकांना भेटतोस ना?’’ आजही ‘साहेब’ लोकांना भेटतात की नाही किंवा आपल्या मतदारसंघात ते किती वेळ असतात? लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येते का? यावर निवडणुकीतील यश – अपयश अवलंबून असते.

अयोध्येविषयी बोलत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा रामाने मांडला आहे, जो पाण्याविषयीचा आहे. तो विचारतो की, तुझ्या राज्यातील शेती ‘अदेवमातृका’ आहे ना? आपल्याकडे शेतीचे दोन प्रकार मानले जातात. ‘देवमातृका’ शेती म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी, पर्यायाने दैवावर अवलंबून असणारी शेती आणि ‘अदेवमातृका’ म्हणजे तलाव, पाट, कालवे यांच्या पाण्यावर केली जाणारी शेती. अर्थात जल व्यवस्थापन करणे रामाला अपेक्षित आहे. किती वेगवेगळ्या बाजूने वाल्मीकींनी राज्याचा विचार केला आहे हे इथे पुन्हा एकदा जाणवते. पाण्याबरोबर पैशांचे नियोजन कसे करावे हेही सांगितले आहे. ते आजही लागू पडते. अगदी आपल्या खिशालाही!

श्रीराम विचारतात, ‘‘तुझी मिळकत अधिक आणि खर्च मात्र मर्यादित आहेत ना? तुझे धन योग्य जागीच खर्च करतोस ना? पैसा कोठे खर्च करावा तर देवकार्य, विद्वान, सैन्य आणि मित्र यांच्यावर पैसा खर्च करणे योग्य आहे. याच ठिकाणी श्रीराम म्हणतात, आपल्या संपर्कात येणाऱयाला खुश कसे करायचे याचे तीन उपाय असतात. मान देऊन, गोड बोलून आणि दान देऊन समोरच्याला प्रसन्न करता येते. किती खरे आहे हे! आजही आपल्याला दिवाळी गिफ्ट्स पाठवणारी कंपनी आपल्या मनात सॉफ्ट कार्नर तयार करते, पण त्याचबरोबर जर संबंधित अधिकाऱयाचा प्रत्यक्ष फोन आला किंवा एखाद्या व्यक्तीचे आपल्याला दारापर्यंत सोडायला येणे याचा परिणाम महागडय़ा गिफ्टपेक्षा अधिक असतो.

उद्योगपती टाटा, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती यांच्यासारख्या स्पृहणीय व्यक्तिमत्त्वात हे गुण आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. सगळ्यांना सोबत घेऊन जावे हे सांगताना श्रीराम म्हणतात, ‘‘गोडाधोडाचे एकटाच खात नाहीस ना?’’ या ठिकाणी एका वेद वचनाची आठवण होते – ‘केवलाघो भवति केवलादि’ – जो एकट्याेन खातो तो एकटाच पापाचा धनी होतो. हिंदुस्थानी संस्कृतीची हीच उदात्तता आहे, जी रामायणात आपल्याला सतत जाणवत राहते. याच विवेचनातील अजून काही मुद्दे पाहू पुढील लेखात.

[email protected]
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)