
श्रीगोंदा सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने पदाचा गैरवापर करीत देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली तसेच इतर बनावट बिले तयार करून ती खर्ची टाकून 26 लाख 49 हजार 812 रुपयांचा अपहार केल्याची घटना लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखापरीक्षक आनंद किसनराव भोसले (रा. शाहूनगर, केडगाव) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी फिर्याद दिली आहे. तालुक्यातील लिंपणगाव (पवारवाडी) येथील शिवशंभो विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तत्कालीन सचिव अरुण सदाशिव खळदकर (रा. लिंपणगाव) याने दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पदाचा गैरवापर करत सोसायटीचे संचालक, सभासद यांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली.
देखभाल-दुरुस्ती खर्चाची तसेच इतर खर्चाची बनावट बिले तयार करून ती खर्ची टाकून सोसायटीच्या खात्यातून एकूण 26 लाख 49 हजार 812 रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षक अहवालात उघडकीस आले. त्यानंतर लेखापरीक्षक आनंद भोसले यांनी श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिव अरुण सदाशिव खळदकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.