दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा; विलेपार्ले स्वामी मठात दत्त जयंती उत्सव

विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठात शनिवार 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती सोहळा होणार आहे. सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत भक्तांना दर्शनासाठी खुला राहणार आहे. भक्तांना दर्शन लवकर मिळावे म्हणून विश्वस्त मंडळाने हार, फुले, नारळ, प्रसाद आणू नये असे आवाहन केले आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजता स्वामी महाराजांची पालखी प्रदक्षिणेसाठी निघून रात्रौ 10 वाजेपर्यंत पुन्हा मठात येईल. स्वामी भक्तांनी पालखी प्रदक्षिणेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मठाचे विश्वस्त विनय पंटक, महादेव शहापूरकर, कार्यवाह उदय कौलकर यांनी केले आहे.

माहीम येथे उत्सव

दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या टी. एच. कटारिया मार्ग येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, 14 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.30 वाजता जन्म सोहळा, सायंकाळी 7.30 वाजता भजन आणि रात्री 8.30 वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे.

राऊळ महाराज चौक येथे सांस्कृतिक कार्यक्रम

प. पू. राऊळ महाराज चौक येथे सालाबादप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त शनिवार, 14 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पुरुषोत्तम पावसकर, संतोष मेस्त्राr यांचा भक्तिपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी नैना कांदळकर यांचे गायन, संध्याकाळी आरती व दत्त पाळणा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उदय बांदिवडेकर यांनी दिली.