देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंकेचा माजी प्रसिद्ध फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेला प्रकल्प मुथय्या उभारणार आहे. येत्या एप्रिलमध्ये या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी डी. आर. काकडे यांनी दिली. या प्रकल्पासाठी एक हजार ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, या कंपनीमध्ये विविध शीतपेयांसाठी लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे.
मुथय्या मुरलीधरन याने ‘सिलोन बेव्हरेजेस’ या उद्योगसमूहाची उभारणी केली असून, विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्पांबरोबरच मुरलीधरनने त्याच्या उद्योगाचा विस्तार वाढवत आता थेट सुप्याच्या एमआयडीसीमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगासाठी ३५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून, त्यातून ४५५ तरुणांना रोजगारनिर्मिती होणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळाकडे मुथय्या मुरलीधरन याच्या कंपनीकडून जागेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन कमिटीच्या बैठकीत भूखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाच्या बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी काकडे यांनी सांगितले.
कशाची निर्मिती होणार
शीतपेये, ऊर्जापेये, तसेच खनिज पाण्याचे कॅन तयार करणे व ते त्यात भरून देणे हे काम या कंपनीकडून करण्यात येणार आहे. लवकरच या उद्योगसमूहास भूखंड प्रदान करण्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाकडून पहिल्या टप्प्याची रक्कम भरण्यासंदर्भात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीस २५ टक्के रक्कम अदा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम घेण्यात येईल. त्यानंतर ‘सिलोन बेव्हरेजेस’ कंपनीस भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहे. एक लाख ४० हजार स्क्वेअर मीटर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे.
सर्वाधिक गुंतवणूक असणारा प्रकल्प सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीच्या म्हसणे फाटा विस्तारित वसाहतीमध्ये सन २०१८मध्ये ‘कॅरिअर मायडिया’ या कंपनीच्या माध्यमातून एका मोठ्या कंपनीची मुहूर्तमेढ झाली. त्यानंतर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ३३ उद्योग सुरू झाले. सरत्या वर्षअखेर या वसाहतीमध्ये पाच हजार १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून १० हजार ५८४ तरुणांना रोजगार मिळाला. ‘सिलोन बेव्हरेजेस’च्या माध्यमातून तब्बल एक हजार ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा सर्वाधिक मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये उभारला जाणार आहे. ‘कॅरिअर मायडिया’ या कंपनीने या वसाहतीमध्ये ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
अप्रत्यक्ष अंबानींचीही ‘एण्ट्री’
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्टसाठी श्रीलंकेतून ‘कॅम्पा कॅन’ची आयात करण्यात येते. ‘सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनल’ने रिलायन्सच्या उत्पादनांसाठी सुप्यात हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीतमध्ये अप्रत्यक्ष अंबानी उद्योगसमूहाचीही एण्ट्री झाली आहे.
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग उभारले गेले आहेत. काही उद्योगांची उभारणी सुरू आहे. हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. देशातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून या वसाहतीकडे पाहिले जात आहे. येथील उद्योजकांना संरक्षण देण्याचे काम आम्ही करतो. श्रीलंकेचे फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या कंपनीकडून सुप्याच्या औद्योगिक वसाहतीस प्राधान्य दिले, हे या वसाहतीमधील औद्योगिक शांततेचे प्रतीक आहे. या वसाहतीमधील दादागिरीबाबत विरोधकांकडून उठवण्यात येणाऱ्या आवईला ही चपराक आहे. येथे उद्योग उभारणीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह उत्सुक असून, ते आपल्या संपर्कात आहेत.
नीलेश लंके, खासदार
मुथय्या मुरलीधरनच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भूखंडासंदर्भात समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पास भूखंड देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असून, बैठकीचे इतिवृत्त उद्योग मंत्रालयास सादर केले आहे. आता औद्योगिक विकास महामंडळाकडून मुथय्याच्या उद्योगसमूहास ऑफर लेटर देण्यात येईल. त्यानंतर साधारणतः एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होईल.
– डी. आर. काकडे, उपप्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी