श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचा मुलगा योशिता राजपक्षे याला पोलिसांनी मालमत्ता खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. योशिता यांना शनिवारी बेलियाट्टा येथून अटक करण्यात आली. वर्ष 2015 च्या आधी मालमत्तेच्या खरेदीत कथित गैरव्यवहार केल्या प्रकरणी योशिता यांची चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी याच प्रकरणात योशिता याचे काका आणि श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचीही चौकशी केली होती.
योशिता राजपक्षे हे श्रीलंकेचे खेळाडू राहिले आहेत. ते श्रीलंका राष्ट्रीय रग्बी युनियन संघ आणि नेव्ही एससी रग्बी संघाचे कर्णधार होते. त्यांनी नौदल अधिकारी म्हणूनही काम केलं आहे. ते श्रीलंकेच्या नौदलात लेफ्टनंट कमांडर होते. योशिता यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केलं आहे. राष्ट्रपतींचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
दरम्यान, महिंदा राजपक्षे हे 19 नोव्हेंबर 2005 ते 9 जानेवारी 2015 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळ 9 वर्षे, 1 महिना आणि 21 दिवसांचा होता. याच काळात मालमत्ता खरेदीत कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.