कामिंदु मेंडिसने साधली डॉन ब्रॅडमन यांची बरोबरी, तेराव्या डावातच गाठला कसोटीच्या एक हजार धावांचा टप्पा

पहिल्या आठही कसोटींत सलग अर्धशतकी टप्पा गाठण्याचा महापराक्रम रचणाऱ्या श्रीलंकन फलंदाज कामिंदु मेंडिसने आज आपल्या तेराव्या डावातच एक हजार धावांचा टप्पा गाठत सर डॉन ब्रॅडमन यांच्या पराक्रमाचीही बरोबरी साधली. तो कसोटी इतिहासात कमी डावात एक हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसरा फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 182 धावांची अभेद्य खेळी आणि कुसल मेंडिससह (106) सहाव्या विकेटसाठी 200 धावांची नाबाद भागी केल्यामुळे श्रीलंकेने आपला पहिला डाव 5 बाद 602 धावांवर घोषित केला आणि दिवसअखेर न्यूझीलंडची 2 बाद 22 अशी नाजूक अवस्थाही केली.

दोन वर्षांपूर्वी गॉल कसोटीतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 61 धावांची खेळी करत पदार्पण करणाऱ्या कामिंदु मेंडिसने काल सलग आठ कसोटींत अर्धशतके ठोकत नवा पराक्रम केला होता. आज त्याने यात नव्या विक्रमाची भर घातली. त्याने आपल्या आठव्या कसोटीतील 13व्या खेळीत 182 धावांची भन्नाट खेळी करताना अनपेक्षितपणे 1 हजार कसोटी धावांचा टप्पा गाठला.

कामिंदू मेंडिसचा अद्भुत विक्रम

13 डावांत एक हजार कसोटी धावा करणारा चौथाच फलंदाज. ब्रॅडमन यांनी 7 कसोटींतील 13 डावांत हा टप्पा गाठला, तर हर्बर्ट सटक्लिफ आणि एव्हर्टन वीक्स यांनी 9 कसोटींच्या 12 डावांत हा विश्वविक्रम रचला होता, जो आजही अबाधित आहे.

पदार्पणापासून सलग आठ कसोटींत अर्धशतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज. पाकिस्तानच्या सऊद शकीलने पदार्पणापासून सलग सात कसोटींत अर्धशतकी खेळी केल्या होत्या. पहिल्या एक हजार धावांमध्ये पाच शतके ठोकणारा दुसराच फलंदाज. याआधी एव्हर्टन वीक्स यांनीच हा पराक्रम केला आहे.

कसोटी इतिहासात हजार धावांचा टप्पा गाठताना 90 पेक्षा अधिक धावांची सरासरी राखणारा तो ब्रॅडमननंतर दुसराच फलंदाज ठरला आहे. 2024 या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत 94.30 धावांच्या सरासरीने 5 शतके आणि 3 अर्धशतकांसह अवघ्या 7 कसोटींत 943 धावा केल्या आहेत. यंदा त्यापेक्षा अधिक धावा ज्यो रुटने (986) केल्या आहेत.