निस्सांकाचा डंका, तिसरी कसोटी जिंकत श्रीलंकेने केला शेवट गोड

पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभवांमुळे खचलेल्या श्रीलंकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत यजमान इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत हरवण्याचा पराक्रम केला. सलामीवीर पथुम निस्सांकाच्या अभेद्य 127 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडचे 219 धावांचे आव्हान सहजगत्या गाठले आणि 8 विकेट राखून संस्मरणीय विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे पहिल्या डावात 62 धावांची पिछाडी असतानाही श्रीलंकेने कसोटीत बाजी मारली.

रविवारीच निस्सांकाच्या झंझावाती प्रारंभामुळे श्रीलंकेने विजयाच्या दिशेने पावले टाकली होती. रविवारच्या 1 बाद 94 वरून खेळ पुढे सुरू करताना निस्सांका पुन्हा एकदा इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडला आणि त्याने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. रविवारी 42 चेंडूंत पन्नाशी गाठणाऱ्या निस्सांकाने 107 व्या चेंडूवर आपले दुसरे कसोटी शतक साजरे केले. अॅटकिन्सनने 108 धावा असताना श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. पण त्यानंतर आलेल्या अँजेलो मॅथ्यूजने निस्सांकाच्या साथीने 111 धावांची अभेद्य भागी रचत संघाचा सुपरफास्ट विजय निश्चित केला. त्यांनी 153 चेंडूंच्या खेळातच 125 धावा चोपून काढल्या आणि पहिल्या सत्रातच ओव्हलवर इंग्लंडचा खेळ खल्लास केला. सामन्यात 64 आणि नाबाद 127 धावांची खेळी करणारा निस्सांका ‘सामनावीर’ ठरला, तर मालिकेत 375 धावा करणाऱ्या ज्यो रुटने ‘मालिकावीरा’चा मान मिळवला.