
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर श्रीलंकेने 14 हिंदुस्थानी मच्छीमारांची सुटका केली. मोदींनी काल श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसनायके यांच्याशी चर्चा केली होती. तीन दिवसांचा श्रीलंका दौरा आटोपून मोदी मायदेशी रवाना झाले. आज त्यांनी माहो ओमानथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले तसेच बौद्ध तीर्थस्थळ अनुराधापुरा येथे सिग्नल यंत्रणेची पायाभरणी केली. यावेळी मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्यासोबत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
दौऱयाच्या दुसऱया दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी मोदींनी हिंदुस्थानातील मच्छीमारांच्या अटकेवर आणि तमीळ समुदायाच्या हक्कांवर चर्चा केली. मच्छीमारांची सुटका आणि त्यांच्या बोटीही त्यांना परत देण्यावर जोर देण्यात आल्याचे मोदींनी एक्स पोस्टद्वारे सांगितले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मोदी श्रीलंकेतील तमीळ समुदायाला भेटले. तसेच कोलंबो येथील हिंदुस्थानी शांतता स्मारकात हिंदुस्थानी लष्कराच्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. 1996चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱया श्रीलंकेच्या संघाचीही मोदींनी भेट घेतली. दरम्यान, दोन्ही बाजूंनी मच्छीमारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.