साई किशोरमध्ये यशस्वी गोलंदाजाचे सर्व गुण – व्हिट्टोरी

गुजरात सुपर जायंट्स संघाचा आर. साई किशोर याच्यामध्ये मर्यादित षटकांतील यशस्वी गोलंदाज होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण ठासून भरलेले आहेत, अशा शब्दांत हैदराबादचे प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी यांनी त्याचे कौतुक केले आहे.

आयपीएलच्या लिलावादरम्यान हैदराबाद फ्रँचायझीने या डावखुऱ्या फिरकीपटूला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावला होता, असा खुलासाही त्यांनी केला. हैदराबादच्या चेन्नईवरील विजयानंतर व्हिट्टोरी यांना विचारण्यात आले की, तुम्ही कोणत्या डावखुऱ्या फिरकीपटूपासून प्रभावित आहात? त्यावर ते म्हणाले की, मी साई किशोरचे नाव घेईन. त्याने शानदार कामगिरी केली आहे. तो असा एक खेळाडू होता, ज्यावर लिलावात आमची नजर होती. आम्ही त्याला संघात घेऊ इच्छित होतो. साई किशोरमध्ये मर्यादित षटकांचा यशस्वी गोलंदाज होण्यासाठी आवश्यक सर्व गुण आहेत.

व्हिट्टोरी म्हणाले की, ‘तो एक निर्भीड गोलंदाज आहे. त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची, खेळपट्टीवर आणि जवळपास आपला वेग बदलण्याची क्षमता आहे. त्याने अन्य फिरकीपटूंसाठी मानदंड स्थापित केले आहेत असे मला वाटते. तुम्ही प्रत्यक्षात कशी प्रतिस्पर्धा करू शकता आणि यशस्वी होऊ शकता हे तो दाखवून देतो. त्याने फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवरही बळी टिपले आहेत, अशा शब्दात त्यांनी साई किशोरचे कौतुक केले.’

IPL 2025 – मुंबई-लखनौ यांच्यात आज रस्सीखेच