मुंबईत वांद्र्यामध्ये SRA च्या पाडकामाविरोधात शिवसेनेचे आंदोलन; अदानींसाठी कारवाई, ही कुठली हुकूमशाही, वरुण सरदेसाई आक्रमक

मुंबईत वांद्र्यातील भारतनगरमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन सुरू आहे. भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर एसआरएकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाईसाठी कर्मचारी तसेच जेसीबी आणण्यात आला आहे.  एसआरएच्या पाडकामाविरोधात शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आमदार वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित आहेत.

एसआरएच्या पाडकामाला स्थानिकांनी विरोध केला आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी या कारवाईला विरोध केला आहे. यामुळे मोठ्या फौजफाट्यात ही कारवाई केली जात आहे. एसआरए आणि मुंबई महापालिकेचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित आहेत. एसआरएच्या या कारवाईला शिवसेनेने विरोध केला आहे.

परवा मी संपूर्ण दिवस एसआरएच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून होतो. ही कारवाई करू नका, लोकांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो. पण लोकांना विकत घेता येणार नाही. अदानी ग्रुपने पाहिजे तेवढा फोर्स आणला तरी काहीही फरक पडणार नाही. इथे मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी वाढत चालली आहे. कितीही पोलीस आले तरी ते कमी पडतील. यामुळे ही कारवाई करू नका, असा इशारा वरुण सरदेसाई यांनी यावेळी दिला.

सरकारला कळकळीची विनंती आहे, ही कारवाई करू नका. मुख्यमंत्र्यांपासून ते सगळ्या मंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काहींनी आश्वासनं दिली, पण कारवाई थांबवण्यात येत नाहीये. इथला विकास कारयचा आहे तर, लोकांना विश्वासात घेऊन करा. दोन दिवसापासून मी प्रयत्न करतो. अदानी ग्रुपचे सीईओ सुद्धा एसआरएच्या ऑफिसमध्ये आले होते. आज जी 180 घरं तोडण्यात येत आहे, त्या एकाही घरासोबत अदानी एसआरएचा करार झालेला नाही, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

तुम्हाला इकडे एसआरएची स्कीम राबावायची आहे, तुम्हाला विकास करायचा आहे, जे करायचं ते करा. पण तुम्ही ज्यांची घरं तोडताहेत एसआरएच्या कायद्यानुसार तुम्ही त्यांच्यासोबत करार तर करा. इथल्या लोकांना घर कुठे मिळणार? किती स्क्वेअर फूटची मिळणार, त्यांन मोबदला कधी मिळणार? त्यांना उत्तरं तरी द्या. ही कुठली हुकूमशाही? इकडे अदानी ग्रुपचा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. अदानी ग्रुपसमोर सगळे बहिरे झाले आहेत, असा हल्लाबोल वरुण सरदेसाई यांनी केला.