क्रीडा शिक्षकाने केला तेरा वर्षांच्या खेळाडूवर अत्याचार

राष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळण्यासाठी निवड झाल्याचे सांगून एका तेरावर्षीय खेळाडूस मुंबईला जाण्यासाठी घेऊन निघालेल्या क्रीडा शिक्षकाने रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची वाच्यता कुठे केल्यास गावात सांगून तुझी बदनामी करीन, अशी धमकी नराधमाने दिली होती. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी दोन वाजता अत्याचार करणाऱ्या नराधमासह हॉटेल मालक महिला व व्यवस्थापकासह तिघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पैठण तालुक्यातील एका खेडे गावात शिकणाऱ्या मुलीची निवड राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पार्वेसाठी झाली
होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुंबईला जावे लागेल, असे नराधम क्रीडा शिक्षक शिवाजी जगन्नाथ गोरडे (रा. बालानगर, तालुका पैठण) याने सांगून पीडिता मुलीला सोबत घेऊन निघाला होता. छत्रपती संभाजीनगर येथे 29 सप्टेंबर रोजी आल्यानंतर ‘रात्री दहा वाजेची रेल्वे आहे. तोपर्यंत आपण जवळ असलेल्या हॉटेल पंजाब येथे थांबू…’ असे खोटे तिला सांगितले होते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ‘तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…’ असे सांगून अल्पवयीन पीडितेवर दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अत्याचार केला.

पीडितेने विरोध केला, मात्र रूमचा दरवाजा बंद असल्यामुळे कोणीही मदतीला धावून आले नाही. हा घडलेला प्रकार बाहेर कोणाला सांगितले तर तुझी बदनामी करीन, अशी धमकी आरोपी शिवाजी गोरडे याने दिली होती.

पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने तात्काळ वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांना सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपी अशोक गोरडे, ग्रेट पंजाब हॉटेलची मालकीण पूजा रोहित राठोड, व्यवस्थापक सादिक मिर्झा वेग यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी करीत आहेत.