हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर दोम्माराजू गुकेश आणि चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेन यांच्यातील 13 वा डावही बरोबरीत सुटला. त्यामुळे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गुकेश आणि लिरेन यांनी 6.5 गुणांसह पुन्हा एकदा बरोबरी साधली आहे. आता अजिंक्यपदाचा 14 आणि शेवटचा डाव शिल्लक असून हा डावही बरोबरीत सुटला तर अजिंक्यपदाचा फैसला टायब्रेकरने लावला जाणार आहे. अकराव्या डावात गुकेशने लिरेनला धक्का देत 6.5 गुणांसह जेतेपदाच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र 12 व्या डावात पुन्हा लिरेनने बाजी मारत बरोबरी साधली. आज दोघांनीही विजयासाठी प्रयत्न केले, पण बरोबरीची कोंडी कुणालाही फोडणे शक्य झाले नाही. जर गुकेश ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.