त्याला पत्रकार परिषदेपासून दूर ठेवा; संजय मांजरेकर गौतम गंभीरवर संतापले

न्यूझीलंड कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका होत आहे. या पराभवानंतर गौतम गंभीरने पहिल्यांदाच पत्रकारपरिषद घेतली. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटून संजय मांजरेकर यांना गौतम गंभीरने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर नाराजी व्यक्त करत गंभीरकडे बोलण्याची योग्य शैली नाही. त्यामुळे गौतम गंभीरला पत्रकार परिषदेपासून दूर ठेवा आणि रोहित किंवा आगरकर यांना पत्रकार परिषदेला पाठवा, असे मतही संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेत गंभीर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सर्व प्रश्नांची संमर्पक उत्तरे दिली. ही पत्रकार परिषद संपल्यावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एक ट्विट करत गौतम गंभीर याच्यावर संताप व्यक्त केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण गौतम गंभीरची पत्रकार परिषद पाहिली. त्याला पडद्यामागे काम करू द्या, त्याला अशा कामापासून दूर ठेवले पाहिजे, तेच बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्याच्याकडे (गंभीर) ना कोणाशी बोलण्यासाठी ना योग्य शब्द आहेत ना बोलण्याची शैली. त्याच्याऐवजी रोहित आणि आगरकर यांनी माध्यमांशी सामोरे जाणे चांगले, असेही मतही त्यांनी व्यक्त केले.

संजय मांजरेकर अनेकदा सोशल मीडियावर बेधडकपणे मतं व्यक्त करतात. आता त्यांनी गंभीरवर संताप व्यक्त केला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव पत्करावा लागला तेव्हाही गौतम गंभीर यांच्यावर टीका झाली होती. आता मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.