मी फोन आणि कॉम्प्युटरपासून दूर जात गुकेशच्या जगज्जेतेपदाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. गुकेशच्या काकूनेच गुकेशने जगज्जेतेपद मिळवत इतिहास रचल्याची आनंदाची बातमी मला सर्वप्रथम दिली. माझा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. केवळ माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, अशी भावना डी. गुकेशची आई पद्माकुमारी यांनी व्यक्त केली.
चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करून डी. गुकेश बुद्धिबळाचा नवा जगज्जेता बनला आहे. गुकेश याने सर्वात युवा विश्वविजेता होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
गुकेशच्या या विजयाने त्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. हा खरोखर आनंदाचा क्षण आहे. परंतु गुकेशने केलेला त्याग, विशेषतः गुकेशच्या वडिलांचे समर्पण हे उल्लेखनीय आहे. आमच्या कठीण प्रवासात सर्व कुटुंब आणि मित्र परिवाराची मोलाची साथ लाभली. आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत, अशी भावना जे पद्माकुमारी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
आमचे कुटुंब हे मध्यमवर्गीय असल्याने आम्हाला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. पण त्या वेळी मला ते कळले नाही. 2017 आणि 2018मध्ये आमच्याकडे पैशांची कमतरता होती. तेव्हा माझ्या पालकांच्या मित्रांनी मला प्रायोजित केले. माझ्या पालकांना माझ्या स्पर्धांसाठी जीवनशैलीत बरेच बदल करावे लागले. त्यांनी सर्वाधिक त्याग केल्यानेच मी हे यश मिळवू शकलो, अशी भावना डी. गुकेशने व्यक्त केली.
वडिलांनी सोडला व्यवसाय
गुकेश बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला. मात्र त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनीदेखील अथक मेहनत, त्याग केला आहे. गुकेशचे वडील रजनीकांत ईएनटी सर्जन आहेत. आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. मुलासाठी रजनीकांत यांना वैद्यकीय प्रॅक्टिस थांबवावी लागली. वैद्यकीय व्यवसाय बंद करून त्यांनी संपूर्ण लक्ष आपल्या मुलावर केंद्रित केले. जेव्हा गुकेश ग्रॅण्डमास्टरचा किताब मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यात होता, तेव्हा त्याची आई घरखर्च सांभाळत होती. गुकेश याच्याकडे बुद्धिबळासाठी कोणी प्रायोजक नव्हते तेव्हा त्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आणि क्राउड फंडिंगमधून त्याने आर्थिक वाट काढली. गुकेशने बुद्धिबळासाठी नियमित शाळेत जाणेही थांबवले होते.