दिल्ली, बडोदा, एमपीनेही गाठली उपांत्य फेरी

आज सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या चार उपांत्यपूर्व सामन्यापैकी दोन सामन्यांत धावांचा पाठलाग करणारे संघ जिंकले तर दोन संघ पाठलाग करण्यात अपयशी ठरले. दिल्लीने अनुज रावतच्या 33 चेंडूंतील 73 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकारांचा वर्षाव केला. त्याच्या नाबाद झंझावातामुळे दिल्लीने 3 बाद 193 अशी दमदार मजल मारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना प्रियम गर्गने 54 धावांची वेगवान खेळी करत उत्तर प्रदेशच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण तो बाद झाल्यानंतर यूपीच्या डावाला कुणीही वेग देऊ शकला नाही आणि त्यांचा संघ पाठलागात मागे पडला. अखेर त्यांचा संघ 174 धावांवर बाद झाला.

सौराष्ट्रने चिराग जानीच्या 80 धावांमुळे मध्य प्रदेशसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले, पण मध्य प्रदेशने आपल्या आघाडीच्या सहाही फलंदाजांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर विजयी लक्ष्य 4 चेंडू आधीच गाठले. मध्य प्रदेशच्या सलामीवीर अर्पित गौडने सर्वाधिक 42 धावा केल्या.

आज मोहम्मद शमीचा बंगाल उपांत्य पूर्व फेरीत हरला. बडोद्याने शाश्वत रावत (4)0 आणि अभिमन्यूसिंह राजपूत (37) यांच्या जोरावर 7 बाद 172 अशी मजल मारली, पण या धावांचा पाठलाग करताना बंगालचे आघाडीवर पुरते अपयशी ठरले. लकमन मेरीवालाने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत बंगालचे कंबरडे मोडले. अपवाद एकट्या शाहबाज अहमदचा. त्याने 36 चेंडूंत 55 धावा काढत संघाच्या विजयासाठी थोडेफार प्रयत्न केले. पण त्यांचा संघ विजयापासून खूप दूर फेकला गेला होता. तो बाद होताच बंगालचा डावही 131 धावांवर संपला.