पाच षटकांत विजयासाठी 65 धावांची गरज असताना अजिंक्य रहाणेच्या तडाखेबंद खेळीच्या विकेटने मुंबईला जबर धक्का बसला होता. पण पुढील पाच चेंडूंत स्वतःला सावरत सूर्यांश शेडगे आणि शिवम दुबेने विदर्भच्या गोलंदाजांवर षटकार हल्ला चढवत मुंबईला 4 चेंडू आधीच विजय मिळवून देत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच अन्य उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा, मध्य प्रदेश आणि दिल्लीनेही विजय नोंदविले. त्यामुळे आता उद्या शुक्रवारी मुंबई विरुद्ध बडोदा आणि दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश असे उपांत्य सामने रंगतील.
आज झालेल्या चारही उपांत्य लढतीत मुंबई-विदर्भ यांच्यातील लढतीत धावा आणि षटकारांचा पाऊस पडला. विदर्भाने अथर्व तायडे (66), अपूर्व वानखेडे (51) आणि शुभम दुबे (नाबाद 43) यांच्या फटकेबाजीमुळे 6 बाद 221 धावांचा डोंगर रचला. त्यामुळे मुंबईसमोर 222 धावांचे जबरदस्त आव्हान होते. पण आज मुंबईला पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी 7 षटकांतच 83 धावांची आक्रमक सलामी देत विदर्भच्या आव्हानाला आटोक्यात आणले. शॉने 26 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकारांची बरसात करत 49 धावा ठोकल्या.
अजिंक्यचा सुपरफास्ट खेळ कायम
पृथ्वी शॉबरोबर 83 धावांची झंझावाती सलामी दिल्यानंतर मुंबईला श्रेयस अय्यर (5) आणि सूर्यकुमार यादव (9) असे दोन धक्के बसले. पण धक्क्यातूनही अजिंक्यने आपला सुपरफास्ट खेळ कायम ठेवला. त्याने 45 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत 84 धावा चोपल्या. तो आज आपले झंझावाती शतकही साजरे करण्याची चिन्ह असताना बाद झाला. त्याने स्पर्धेतील गेल्या सहा सामन्यांत चार अर्धशतके ठोकताना 13, 52, 68, 22, 95, 84 अशा खेळी केल्या आहेत. त्याने आतापर्यंत सहा डावांत 334 धावा केल्या आहेत.
शेडगे-दुबेचा झंझावात
5 षटकांत 65 धावांची गरज असताना अजिंक्य बाद झाला आणि मुंबई दबावाखाली आला. परिणामतः 16 व्या षटकात केवळ पाचच धावा काढता आल्या. मग 24 चेंडूंत 60 धावांचे लक्ष्य गाठायचे होते आणि सूर्यांश-शिवमने सामना फिरवणारी फटकेबाजी केली. त्याने मंदार महालेच्या षटकांत 4, 6, 1, 1, 6, 6 असे फटके मारत 24 धावा वसूल केल्या. या धावांनी मुंबईचे मनोधैर्य उंचावले. मग पुढील दोन षटकांत 30 धावा काढत सूर्यांशने सामनाच संपवला. सूर्यांशने आपल्या 12 चेंडूंच्या खेळीत 4 षटकार आणि 1 चौकार ठोकला. दुबेनेही 37 धावा काढल्या.
धावा-षटकारांचा पाऊस
विदर्भने 221 धावा केल्यानंतरही मुंबईने त्याचा सहज पाठलाग केला. आज या मोठय़ा धावसंख्येच्या सामन्यात एकूण 445 धावा चोपल्या गेल्या. त्यात 39 चौकार आणि 22 षटकारांचा समावेश होता.