![TEJAS](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/TEJAS--696x447.jpg)
प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने 100 मीटर अडथळा शर्यतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. मात्र, छत्रपती संभाजीनगरचा तेजसला तुल्यबळ लढत देणारा महाराष्ट्राचा सिद्धांत थिंगलिया (मुंबई) अर्ध्या शर्यतीत अडखळून खाली पडल्याने त्याचे हक्काचे रौप्यपदक हुकल्याने महाराष्ट्रीयन चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत मुंबईची ऐश्वर्या मिश्रा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
गंगा आंतरराष्ट्रीय ॲथलिट स्टेडियममध्ये रंगलेल्या या लढतीत तेजस शिर्से याने 13.65 सेकंद वेळेसह निर्विवाद वर्चस्व गाजवत नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याने याआधीचा राष्ट्रीय स्पर्धेतील स्वतःचा 2015 साली केलेला 13.71 सेकंद वेळेचा विक्रम आज मोडीत काढला. मात्र, त्याच्या पाठोपाठ धावणारा त्याचा सहकारी सिद्धांत थिंगलिया अखेरचे तीन अडथळे शिल्लक असताना अडखळून खाली पडला अन् त्याचे पदक जिंकण्याचे स्वप्न क्षणात धुळीस मिळाले. या गडबडीत तमिळनाडूच्या आर.मानव याने 14.03 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर केरळच्या महंमद लाझान याने 14.23 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या 400 मीटर शर्यतीत ऐश्वर्या मिश्रा हिने स्वतचाच स्पर्धा विक्रम मोडीत काढत 51.12 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. या प्रकारातील राष्ट्रीय विक्रम हिमा दास हिच्या नावावर अबाधित आहे. तिने तो 2018 साली केला होता. ऐश्वर्याने या स्पर्धेत 2022 मध्ये केलेला 52.50 सेकंद वेळेचा विक्रम आज स्वतः मोडीत काढला. तमिळनाडूच्या विथया रामराज हिने 54.43 सेकंद वेळेसह रौप्य, तर गुजरातच्या देवयानी झाला हिने 54.44 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
सोनेरी पदकाची खात्री होती-तेजस मला ही शर्यत जिंकण्याचा सुरुवाती पासूनच आत्मविश्वास होता. तरीही माझा सहकारी सिद्धांत थिंगलिया याच्याकडून मला चिवट लढत अपेक्षित होती. दुर्दैवाने मध्येच पडल्यामुळे सिध्दांत याला शर्यत अर्धवट सोडावी लागली. अन्यथा अधिक चांगल्या वेळेत मी ही शर्यत जिंकली असती, असे सांगून 110 मीटर्स हर्डल्स विजेता तेजस शिरसे म्हणाला,” अर्थात येथील सुवर्णपदकाचा मला विशेष आनंद झाला आहे. कारण मी महाराष्ट्राला हे यश मिळवून दिले आहे. आशियाई इनडोअर स्पर्धेतील विजेतेपदाचा मला येथे फायदा झाला. भावी करिअरसाठी येथील यश मला प्रेरणादायी ठरणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे,
मोसमाची सुरुवात सोनेरी यशाने झाली- ऐश्वर्या
ऐश्वर्या ही मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून सन 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. 25 वर्षीय खेळाडू ऐश्वर्याची राज्य शासनाने नुकतीच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. “प्रत्येकाला आपल्या स्पर्धात्मक मोसमाची सुरुवात सर्वोच्च यशाद्वारे व्हावी असे वाटत असते आणि मी देखील त्यास अपवाद नाही. येथे मला सुवर्णपदक मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला आहे. या सुवर्णपदकामुळेच माझ्या यंदाच्या मोसमाची सुरुवात झाली आहे.” असे 400 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळवणारी ऐश्वर्या मिश्राने सांगितले. मला यंदा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी पात्रता पूर्ण करण्याचे माझे नियोजन आहे कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याचे माझे ध्येय आहे, असे ऐश्वर्याने सांगितले.