कुस्ती महासंघावरील बंदी उठवली !

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या कथित लैंगिक शोषणामुळे जागतिक कुस्ती क्षेत्रात नाचक्की झालेल्या राष्ट्रीय कुस्ती महासंघावरील बंदी क्रीडा मंत्रालयाने अखेर मंगळवारी उठवली. त्यामुळे तब्बल 15 महिन्यांनंतर ‘डब्ल्यूएफआय’चा आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाची निवड करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

‘डब्ल्यूएफआय’ वरील बंदीमुळे आतापर्यंत स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) व अॅडहॉक कमेटी (अस्थायी समिती) यांच्याकडे या कुस्ती महासंघाची प्रशासकीय जबाबदारी होती. 2023 मध्ये 15 वर्षांखालील व 20 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची घाईगडबडीत घोषणा केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने

‘डब्ल्यूएफआय’ वर तडकाफडकी बंदी घातली होती. दरम्यान, 2023मध्ये 21 डिसेंबरला ‘डब्ल्यूएफआय’चे नवे अध्यक्ष बनल्यानंतर संजय सिंह यांनी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या भागातच नॅशनल ज्युनियर चॅम्पियनशिपचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संजय सिंह हे केवळ नामधारी अध्यक्ष असून, ‘डब्ल्यूएफआय’चा खरा रिमोट अजूनही ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने 24 डिसेंबर 2023 ला ‘डब्ल्यूएफआय’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.