मैदानासाठी राखीव 40 भूखंडांवर अतिक्रमण; कल्याणच्या सुभाष मैदानावरील क्रीडा संकुलाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार

ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक शहर असलेल्या डोंबिवलीत तब्बल 84 भूखंड मैदानासाठी आरक्षित आहेत. त्यातील केवळ 41 भूखंडच पालिकेच्या ताब्यात आहेत, तर क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या 40 हून अधिक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. पालिका मात्र मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवरील अतिक्रमण हटवण्याबाबत ढिम्म आहे. हे धक्कादायक वास्तव असतानाच आता केडीएमसी प्रशासन अस्तित्वात असलेल्या मैदानावरही घाला घालण्याच्या तयारीत आहे. कल्याणमधील सुभाष मैदानावरील क्रीडा संकुल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. मात्र याला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी जोरदार विरोध करत मैदानाचे अस्तित्व मिटवण्याचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. सुभाष मैदान खेळासाठीच राखीव ठेवा. क्रीडा संकुलासाठी अतिक्रमण झालेले भूखंड ताब्यात घ्या, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.

पालिका मुख्यालयालगत असलेल्या सुभाष मैदानात केंद्र शासनाच्या निधीतून क्रीडा संकुल उभारण्याचे काम नागरिकांनी बंद पाडले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी माहिती अधिकारात पालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षित असलेले भूखंड आणि त्यांची सद्यस्थिती याबाबत माहिती मागविली होती. प्रशासनाकडून घाणेकर यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील मुख्य भागासह टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली, ग्रामीण भागासह डोंबिवली शहरात मैदानासाठी 84 भूखंड आरक्षित आहेत. यातील अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. आता तर खेळाडूंचे हक्काचे मैदान असलेल्या सुभाष मैदानावरच पालिका प्रशासनाने क्रीडा संकुलाचा घाट घातला आहे. बंदिस्त क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मैदान संपविण्याच्या पालिकेच्या या प्रयत्नांना कल्याणकरांनी कडवा विरोध केला आहे.

मैदान गिळंकृत करण्याचा बालहट्ट कुणाचा?

सुभाष मैदानावरच क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अतिक्रमण करण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचा आरोप क्रीडाप्रेमींसह नागरिकांनी केला आहे. क्रीडा संकुल मैदानासाठी आरक्षित असलेल्या इतर कोणत्याही भूखंडावर उभारता येऊ शकेल. मात्र सुभाष मैदानाचाच हट्ट कशासाठी, अशी विचारणा केली जात आहे. मैदान गिळंकृत करण्याचा बालहट्ट अधिकाऱ्यांचा आहे की सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा, असा खोचक सवालही कल्याणकरांनी उपस्थित केला आहे.