हिंदुस्थानी महिलांची पराभवाची हॅट्ट्रिक

पहिल्या दोन सामन्यांत हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची धूळधाण उडवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात टाकली होती तर आज तिसऱ्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधनाच्या 105 धावांच्या झुंजार खेळीनंतरही हिंदुस्थानी महिलांना 83 धावांनी पराभव सहन करावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादले.

ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात हिंदुस्थानी महिलांना अवघ्या 100 धावांत गुंडाळून विजयी लक्ष्य 202 चेंडू आधी गाठले आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 122 धावांचा मोठा विजय नोंदवत मालिकाही जिंकली होती. आज हिंदुस्थानने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी दिली. अरुंधती रेड्डीने अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद करत 4 बाद 78 अशी अवस्था केली होती. मात्र त्यानंतर ऍनाबेल सदरलॅण्डने 110 धावांची आक्रमक खेळी करत ऍशले गार्डनरसह (50) आणि कर्णधार टॅहिला मॅकग्रासोबत (नाबाद 56) संघाला त्रिशतकासमीप नेले. त्यानंतर हिंदुस्थान 299 धावांच्या डोंगरापुढे आधीच वाकला होता. या धावांचा पाठलाग करताना रिचा घोष (2) लवकर बाद झाली. मात्र त्यानंतर मानधनाने हरलीन देओलसह 118 धावांची भागी रचत आपले आव्हान कायम राखले, पण ही जोडी फुटल्यानंतर मानधनाला एकाही फलंदाजाची साथ लाभली नाही आणि हिंदुस्थानने सामना गमावला. मानधनाने 109 चेंडूंत 105 धावा केल्या.