आधीच पंडय़ाचे ‘हार्दिक’ अभिनंदन? नव्या टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनबाबत साऱ्यांना उत्सुकता

हिंदुस्थानी संघ जगज्जेता होताच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तीन दिग्गजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आणि एका क्षणात हिंदुस्थानी संघात पोकळी निर्माण झाली. आता हिंदुस्थानच्या नव्या दमाच्या नव्या नेतृत्वाबाबत निवड समितीची अंतिम चर्चा झाली असून ते मायदेशी परतल्यानंतर आपला निर्णय जाहीर करतीलच; पण त्याआधी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱया हार्दिक पंडय़ाकडे टीम इंडियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याचे संकेत खुद्द बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे निवड समितीचे सदस्य येऊन केवळ औपचारिकता पूर्ण करतील, असेच बोलले जात आहे.

2022 साली टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात दारुणरीत्या पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंडय़ाकडे हिंदुस्थानी संघाच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. दुखापतीमुळे संघातून बाहेर होण्यापूर्वी त्याने 16 टी-20 सामन्यांत संघाचे नेतृत्वही केले होते. मात्र मुंबई इंडियन्सचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका करत त्याची खिल्लीही उडवली होती. त्यातच मुंबई इंडियन्स साखळीतच बाद झाल्याने त्याच्यावर पराभवाचे खापर पह्डण्यात आले. एवढेच नव्हे तर, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या निवडीबाबतही आक्षेप घेतले गेले होते. मात्र टी-20 वर्ल्ड कपमधील त्याच्या अष्टपैलू कामगिरीने साऱयांचीच तोंडे बंद केली आहेत.

हिंदुस्थानी संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी संघनेतृत्वाबाबत आपले विचार मांडताना सर्व निर्णय निवड समिती घेणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी हार्दिक पंडय़ाचे काwतुक करत आपले संकेत दिले आहेत. आयपीएलमधील अपयशानंतरही त्याच्यावर निवड समितीने विश्वास दाखवला आणि त्याची टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवड केली. त्याने वर्ल्ड कपमध्येही स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. रोहित शर्मानंतर टी-20 संघात पंडय़ापाठोपाठ सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. आयसीसी वर्ल्ड कपनंतर सूर्यकुमार यादवकडेही संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते आणि त्याने आपल्या बॅटीचीही कमाल दाखवली होती. तसेच आतापर्यंत इतर दिग्गजांच्या तुलनेत कमी मानसन्मान मिळालेल्या बुमराकडे नेतृत्व सोपविण्याचा विचार केला गेला होता. मात्र फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांना नेहमीच कमी समजण्याची परंपराच असल्यामुळे फार कमीच गोलंदाजांकडे संघाचे नेतृत्व देण्याचे धाडस बीसीसीआयने दाखवले आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात गिल कर्णधार

जगज्जेत्या संघात खेळलेला एकही खेळाडू झिम्बाब्वे दौऱयात खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम संघातही स्थान न मिळवू शकलेल्या शुबमन गिलकडे आगामी पाच टी-20 सामन्यांसाठी नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या संघात संजू सॅमसन आणि यशस्वी जैसवाल हे एकही सामना न खेळलेले दोघे या स्पर्धेत दिसतील.

गंभीरच्याही नावाची घोषणा?

संघाच्या नेतृत्वाबरोबर राहुल द्रविडच्या वारसदाराचेही नाव निवड समिती जाहीर करणार आहे. झिम्बाब्वे दौऱयासाठी व्ही.व्ही.एस, लक्ष्मणकडे हंगामी प्रशिक्षकपद सोपविण्यात आले असले तरी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे नाव सर्वात पुढे आहे. तसेच हे पद तिन्ही संघांसाठी कायम असेल, असेही जय शहा यांनी स्पष्ट केलेय.