कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती दिनानिमित्त 9 ते 12 डिसेंबरदरम्यान व्यावसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ गट आणि महिला गट अशा विविध गटांच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 48 नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. तसेच कबड्डीसह शूटिंगबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धांचेही आयोजन 7 ते 12 डिसेंबरदरम्यान केले आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेली तीन दशके क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार आयोजन केले जात आहे. कबड्डी स्पर्धेच्या आधी 8 डिसेंबरला 24 संघांचा समावेश असलेल्या शूटिंगबॉल स्पर्धेचेही आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आरएमएमएसची मोठी टीम अथक परिश्रम घेत आहे. या स्पर्धांबरोबर कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचेही आयोजन केले जाणार असल्याची माहिती सरचिटणीस मोहिते यांनी दिली.