कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गाव सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीव अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यामुळे इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांची नव्याने अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे. सरचिटणीसपदी चंद्रकांत पाटील यांचीही एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे मिंध्यांच्या मनमानीला महाविकास आघाडीने जोरदार झटका दिला आहे.
कल्याण ग्रामीण क्षेत्रात 27 गाव संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.या समितीने 2002 साली गावांना महापालिकेतून वगळण्यासाठी लढा दिला होता, ज्यामुळे ती गावे पालिकेतून बळगली गेली.मात्र 2015 पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्यात आली, ज्याला या समितीने तीव्र विरोध केला होता. 27 पैकी 18 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, परंतु हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान मिंधे गटाच्या मनमानीला कंटाळून आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी वंडार पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सुरेश म्हात्रे यांची सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या बैठकीला वंडार पाटील, सत्यवान म्हात्रे, विजय भाने, रामदास काळण, दत्ता वझे, तुळशीराम काळण, वासुदेव संते, शरद म्हात्रे आणि राम पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.