विग्नेश पुथूरचा ड्रेसिंग रूममध्ये सन्मान

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला. मात्र, या लढतीत 24 वर्षीय डावखुरा फिरकीपटू विग्नेश पुथूरने एक वेळ सामना मुंबईच्या बाजूने झुकवून सर्वांचे लक्ष्य वेधले होते. रोहित शर्माच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आलेल्या केरळच्या या गोलंदाजाने चेन्नईचे तीन बहुमोल विकेट टिपत खरोखरच इम्पॅक्ट पाडला. सामन्यानंतर चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीनेही त्याला शाबासकी दिली. त्यामुळेच पराभवानंतरही ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर विग्नेश पुथूरचा खास सन्मान करण्यात आला.

मुंबई इंडियन्सच्या संघ मालकीण नीता अंबानी यांनी त्याच्या छातीवर खास बॅच लावून त्याला सन्मानित केले. त्यामुळे विग्नेशने आपल्या संघ मालकिणीचे चरणस्पर्श करून सर्वांची मने जिंकली. अनपेक्षितपणे सन्मानासाठी आपल्या नावाचा पुकार होताच दूर पाठीमागे उभा असलेला विग्नेश लाजतच पुढे आला. ‘मुंबई इंडियन्सने मला संधी दिल्याबद्दल मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. अशा स्टार खेळाडूंसोबत खेळायला मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. कर्णधार सूर्या भाईने खूप पाठिंबा दिला. त्यामुळे दडपण दूर होण्यास मदत झाली,’ असेही त्याने सांगितले.