हिंदुस्थानी क्रिकेटपटू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला माझा अखेरचा दिवस, मॅचविनर अश्विनची निवृत्ती

आपल्या फिरकीच्या तालावर प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना नाचवणारा हिंदुस्थानचा मॅचविनर फिरकीवीर रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती आज जाहीर केली. हिंदुस्थानसाठी 537 विकेट टिपणारा गोलंदाज कसोटी क्रिकेट खेळता खेळता निवृत्ती न घेऊ शकल्याचे वाईट वाटले.

अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आपल्यात अजूनही शिल्लक असलेला क्रिकेटचा जोश दाखवण्यासाठी क्लब स्तरीय क्रिकेट म्हणजेच आयपीएल आणि त्याच्यासारख्या लीग खेळणार असल्याचे सांगितले आहे.

कसोटीत 537, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 72 असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 765 विकेट टिपणारा अश्विन हिंदुस्थानी भूमीवर सर्वाधिक विजय मिळवून देणारा गोलंदाज ठरला आहे. तो तब्बल 65 कसोटी हिंदुस्थानात खेळला असून त्यापैकी 47 कसोटींत त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर हिंदुस्थानला विजय मिळवून दिले आहेत. केवळ सचिन तेंडुलकरच त्याच्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांत मायदेशी विजयी ठरला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मालिकावीर’ पुरस्काराचा विश्वविक्रम अश्विनच्याच नावावर आहे. त्याने 106 कसोटींत 11 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.

अश्विनने 2011 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने मायदेशात आपल्या फिरकीची कमाल दाखवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मायदेशात 65 कसोटीत 383 विकेट टिपलेत. केवळ अनिल कुंबळेनेच त्याच्यापेक्षा अधिक विकेट मायदेशात टिपले आहेत.

अश्विनची अष्टपैलूही चमक

अश्विनच्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांवर नेहमीच आपली दहशत दाखवलीय, पण त्याच्या फलंदाजीनेही संघाला अनेकदा तारलेय. त्याने चक्क 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावत अनेकदा संकटमोचकाची भूमिका निभावलीय. कसोटी क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक विकेट आणि 3000 पेक्षा अधिक विकेट टिपणारा अश्विन हिंदुस्थानचा एकमेव अष्टपैलू आहे. क्रिकेट जगतात अशी किमया फक्त शेन वॉर्न आणि स्टुअर्ट ब्रॉड या अष्टपैलूंनाच जमलीय.

गरज संपल्याच्या भावनेतून अश्विनचा निर्णय

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या अपयशानंतरच 39 वर्षीय रविचंद्रन अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. या मालिकेत त्याला 3 कसोटीत केवळ 9 विकेट टिपता आल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असताना त्याला वारंवार जाणवत होते की, माझी गरज संपली आहे. याच भावनेतून अश्विनने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अश्विनची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक थांबली.

न्यूझीलंडमधील अपयशानंतर अश्विनला आपल्या निवृत्तीची वेळ जवळ आल्याचे जाणवले. पहिल्या कसोटीत नसलेल्या अश्विनला रोहित शर्माने आग्रह केल्यामुळे गुलाबी चेंडूच्या कसोटीत उतरावे लागले होते आणि हीच कसोटी त्याची अखेरची कसोटी ठरली. अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱयापूर्वीच संघव्यवस्थापनाला सांगितले होते की, जर मला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अंतिम संघात स्थान मिळणार नसेल तर मी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.