
देशभरामध्ये 14 मार्च रोजी धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सर्वत्र रंगांची उधळण करण्यात आली, ठिकठिकाणी तरुणाई होळीच्या गाण्यावर तिरकली. धुळवडीचा उत्साह देशभरात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेससह कॅबिन क्रू ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. स्पाईसजेटच्या विमानातील हा व्हिडीओ असून एका प्रवाश्याने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर तो शेअर केला आहे. मात्र विमानातील या सेलिब्रेशनमुळे दोन गट पडले असून काहींनी याला योग्य, तर काहींनी याला ‘अनप्रोफेशनल’ असे म्हटले आहे.
कॅबिन क्रूच्या डान्सची छोटीशी क्लीप एका उद्योजकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत साडे चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यात सफेद कुर्ता आणि दुपट्टा घेऊन एअर होस्टेसस ‘ये जवानी है दीवानी’च्या गाण्यावर बेधुंद डान्स करताना दिसत आहे. सोबत विमानातील प्रवासीही याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
दरम्यान, विमानात धुळवड खेळण्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहींनी याचे कौतुक केले आहे, तर काहींनी टीका केली आहे. हे स्पाईसजेटचे पतन असल्याची कमेंट एका युजरने केली आहे. तर अन्य एकाने हे अव्यवसायिक असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram