मुलुंड पश्चिमेकडील एका टॉवरमध्ये वॉचमनचे काम करणाऱ्या काकाला जेवणाचा डबा घेऊन निघालेल्या 20 वर्षीय तरुणीवर काळाने घाला घातला. श्रीराम पाडा सर्व्हिस मार्गावर पायी जात असताना मागून आलेल्या ट्रकने तिला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या शालू यादव या तरुणीचा मृत्यू झाला.
मुलुंडच्या अमर नगरात शालू परिवारासह राहत होती. ती शिक्षण घेत होती. शालूचा काका अमरजीत यादव (37) हा एलबीएस मार्गावरील पिरामल टॉवर येथे सुरक्षा रक्षकाचे काम करतो. गुरुवारी सकाळी 11 वाजता शालू ही यादवला जेवणाचा डबा देण्यासाठी घराबाहेर पडली. ती श्रीराम पाडा सर्व्हिस मार्गावर आली असता पाठीमागून वेगात आलेल्या ट्रकने तिला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला नागरिकांनी तत्काळ अग्रवाल इस्पितळात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला सवा बारा वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.
याप्रकरणी शालूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद जाकीर मोहम्मद शब्बीर खान (30) असे त्या चालकाचे नाव आहे. पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.