
>> शिल्पा सुर्वे
दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. साहित्याच्या महाउत्सवात सहभागी होण्यासाठी आणि शुक्रवारी सकाळी साहित्य पालखीचे भोई बनण्यासाठी शेकडो मराठी रसिक आज दिल्लीच्या दिशेने निघाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत महादजी शिंदे एक्प्रेस पुणे स्थानकातून निघाली. यावेळी साहित्यप्रेमींमध्ये कमालीचा उत्साह होता. रेल्वेतल्या पहिल्या साहित्ययात्री संमेलनाने हा उत्साह द्विगुणित केला.
काही वर्षांपूर्वी पंजाबच्या घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाची विशेष ट्रेन तब्बल 36 तास रखडली होती. घुमत घुमत प्रवास करताना साहित्यप्रेमी कंटाळले होते. हा अनुभव पाहता आणि दिल्लीचा दीर्घ प्रवास लक्षात घेता रेल्वे प्रवासात साहित्ययात्री संमेलन आयोजित करण्यात आले. फिरत्या चाकावरचं हे आगळंवेगळं पहिलं संमेलन आहे. झेंडूच्या फुलांनी सजलेली गाडी, साहित्य रसिकांसाठी अंथरलेले रेड कार्पेट, ढोलताशे, तुतारीचे सूर… असे उत्सवी वातावरण निर्माण झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास विशेष ट्रेन पुणे स्थानकातून निघाली. त्याआधी ग्रंथदिंडीचे पूजन होताना अक्षरवारीत टाळ-मृदंगाचा गजर घुमला. पुणे रेल्वे स्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ लेखिका संगीता बर्वे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अभंग, पोवाड्यापासून रॅपपर्यंतचा मराठीचा साज उपस्थितांनी अनुभवला. मायमराठीचा जयघोष घुमला. सुमारे 1200 लोक विशेष ट्रेनने दिल्लीला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
- 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, तालकटोरा स्टेडियम येथे होत आहे.
साहित्ययात्री संमेलनाचा शुभारंभ
विशेष ट्रेनमध्ये पहिले साहित्ययात्री संमेलन आयोजित करण्यात आले. साहित्ययात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत, तर शरद तांदळे अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ आहेत. प्रत्येक बोगीत साउंड सिस्टम, माईकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन साहित्ययात्री संमेलनात महाराष्ट्रातील विविध गावागावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टॅण्डअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळे आपली कला सादर करत आहेत. ज्यांना इच्छा असूनही संमेलनाच्या व्यासपीठावर प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करता येत नाही त्यांच्यासाठी बोगीतील सीट म्हणजे एक मंच झालाय. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेष ट्रेनने प्रवास केला. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन आहे. आज सर्व साहित्यिकांसोबत प्रवास करता येतोय, हा माझा बहुमान आहे. साहित्याचे तख्त मराठी माणूस राखतो असे या विशेष ट्रेनकडे पाहताना वाटते, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.
विशेष ट्रेन ‘महादजी शिंदे एक्प्रेस’ला 16 बोगी असून प्रत्येक बोगीला गडकिल्ल्याचे नाव देण्यात आलेय. प्रत्येक बोगीच्या दारावर तोरणाने सजावट करण्यात आली.