लोकसभेचं अधिवेशन 24 जून, तर राज्यसभेचे 27 जूनपासून; किरेन रिजिजू यांची माहिती

18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार असून 3 जुलै रोजी संपणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दिली. 9 दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन संसद सदस्य (MP) त्यांची शपथ घेतील. दरम्यान, राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जून ते 3 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरचं हे पहिलं संसदेचं अधिवेशन आहे, ज्यामध्ये भाजप स्वबळावर नाही तर NDA च्या जोरावर सत्तेत परतला आहे.

27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. नवीन सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपची रूपरेषा त्या मांडण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा परिचय संसदेत करतील अशी अपेक्षा आहे.