विशेष पोलीस महानिरीक्षक बदली प्रकरण- शासन नरमले, महावरकर यांना आता पिंपरी चिंचवडचे सह आयुक्त म्हणून नियुक्ती मिळणार

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्या चुकीच्या पध्दतीने झालेल्या बदलीबाबत शासन नरमले आहे. शासनाने आता त्यांना बदलीच्या निवडीची पसंती सांगण्याबद्दल चार वेगवेगळे पर्याय दिले होते. त्यानुसार त्यांनी पिंपरी चिंचवड सहआयुक्त या पदाला पसंती दिली. त्यानुसार कॅटमधील झालेल्या या सुनावणीनंतर आता त्यांच्या बदलीचे आदेश येत्या चार-पाच दिवसात निघतील त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप त्यांच्या जागेवर रुजू होतील.

मागच्या आठवड्यात विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची शासनाने अन्यायकारकरित्या बदली केली होती. एप्रिल 2024 मध्ये त्यांना पदोन्नती देत पोलीस उपमहानिरीक्षकाच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली होती. मात्र, नियमानुसार या पदावरुन पदोन्नती झाल्यानंतर किमान वर्षभर त्यांची बदली होऊ शकत नाही. विशेष म्हणजे नांदेडला विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पद मंजूर असताना ते पद अवनवत करुन नुकत्याच बढती मिळालेल्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची महावरकर यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. नियमाविरुध्द झालेल्या बदलीला शशिकांत महावरकर यांनी कॅटमध्ये आव्हान दिले होते. 11 जुलै रोजी कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत आहे त्याच पदावर महावरकर यांना कायम ठेवत सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुणालाही पदभार देऊ नये, असे आदेश देत या सुनावणीच्या तात्पुरत्या स्थगिती आदेशात म्हटले होते. त्यानंतर पुढील सुनावणी 19 जुलै म्हणजे आज ठेवण्यात आली होती.

महावरकर यांच्या आव्हान याचिकेला शासनाने पूर्ण अभ्यास करुन शेवटी नांगी टाकली. आपला चुकीचा झालेला निर्णय गृह खात्याला समजल्यानंतर नरमलेल्या गृहमंत्रालयाने शासनाच्या वतीने महावरकर यांच्याकडे चार पर्याय ठेवले. त्यात नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबई येथील सहआयुक्त व विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाचा समावेश होता. ऑनलाईन व व्हिडीओ कॉन्फरसिंगत झालेल्या या सुनावणीत महावरकर यांनी सहआयुक्त पिंपरी चिंचवड या पदाचा पर्याय दिला. शासन याबाबत सकारात्मक होते. न्यायाधिकरणासमोर आलेल्या या सुनावणीनंतर आता चार ते पाच दिवसानंतर त्यांच्या बदल्यांचे आदेश येतील. साधारणपणे 31 जुलै किंवा 1 ऑगस्टपर्यंत नांदेडच्या पोलीस महानिरीक्षक पदावरुन पदमुक्त होतील व त्यानंतर शहाजी उमाप हे पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारतील. विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जा मिळालेल्या नांदेड परिक्षेत्राला गेल्या पंधरा वर्षात दोनवेळा पदावनत अधिकारी मिळाले. त्यात शहाजी उमाप यांचा समावेश आहे. कॅटचा आदेश असताना व पदभार स्विकारु नये अशा सूचना असताना सुध्दा उमाप यांनी 12 जुलै रोजी नांदेड येथे येवून त्या पदाचा पदभार स्विकारण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅटचे आदेश या कार्यालयाने दाखविल्यानंतर ते माघारी परतले. एकंदरीत चुकीच्या पध्दतीने केलेल्या बदलीबाबत राज्याच्या गृह विभागाने नांगी टाकून नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर आता आपल्या सुचनेनुसार ही बदली झाल्याचे समाधान संबंधित अधिकार्‍याला मिळाले.