इंग्लंडमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष

ढोल-ताशांचा गजर… हाती भगवे झेंडे आणि पताका घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या रणरागिणी… भव्यदिव्य पालखी सोहळा अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आसमंत असे जल्लोषमय आणि उत्साहपूर्ण वातावरण इंग्लंडमधील मिल्टन किन्स शहरात पाहायला मिळाले. निमित्त होते ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कलासंस्कृती ग्रुपच्यावतीने आयोजित विशेष सोहळ्याचे.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आयोजित या सोहळ्यात महिलांनी आपल्या नृत्याविष्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती का म्हटले जाते हे समजावून देण्याचा प्रयत्न केला. शिवरायांना दिलेल्या मानवंदनेत सुप्रिया कांबळे, लक्ष्मी गोरे, आनल गोहिल, अर्चना चोडणकर, मनाली पाटील, प्रिया मेहता, अपर्णा रेड्डी, धनश्री शिंदे, कीर्ती आफळे, भारत बिरदावडे, वैशाली नगरकर आणि अस्मिता बोरगावकर सामील झाल्या होत्या.

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा इंग्लंडमध्ये जपण्यासाठी कला संस्कृती ग्रुपची स्थापना स्वाती थोरात, हेमांगी खाती, विधी चौधरी, स्मिता सोनटक्के, रिया राणे, कल्पना हांडे, पल्लवी मानकर, अमृता मुर्डे, राधिका काशीकर, निमिष हजारे, स्वाती निमजे आणि भाग्यश्री रावराणे-पाटणकर या मैत्रिणींनी एकत्र येऊन केली आहे. या ग्रुपतर्फे शिवजयंती, मंगळागौर, दिवाळी असे सण साजरे केले जातात. तसेच दिवाळीला किल्ला बनवणे, मराठी भाषा प्रशिक्षण वर्गदेखील चालवले जातात. ग्रुपचे स्वतःचे लेझीम आणि ध्वजपथकदेखील आहे.

Displaying IMG_9563-Darade.JPG

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मिल्टन किन्स येथील कलासंस्कृती ग्रुपच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते.