पोलीस सतत बंदोबस्तात गुंतलेले असतात. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली असतात. अशा वेळी कमी वेळात कशी विश्रांती घेता येईल, ‘रिलॅक्स होता येईल, जनतेशी संवाद काwशल्य कसे वाढवता येईल यासाठी ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ या संकल्पनेवर आधारित ‘जन सहयोग फाऊंडेशन’तर्फे प्रसिद्ध माईंड ट्रेनर संदीप चोणकर यांचे एक शिबीर उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या कार्यालयाच्या सभागृहात नुकतेच आयोजित करण्यात आले होते. दहिसर ते जोगेश्वरीपर्यंतच्या 16 पोलीस ठाण्यातील 64 अधिकारी व अंमलदारांनी या शिबिरात अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता. आपल्या पोलीस जीवनातील कटू-गोड, हलकेफुलके अनुभव सांगून अनेक अधिकाऱयांनी व अंमलदारांनी या शिबिरात धमाल उडवून दिली. त्यात मिश्किलपणे पूर्वानुभव सांगणाऱया, कामगिरी करणाऱया 10 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा ‘जन सहयोग फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रभाकर पवार यांच्या हस्ते ‘ट्रॉफी’ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी संदीप चोणकर यांनी ‘विचार बदला, नकारात्मक विचार सोडून सकारात्मक व्हा, नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल’, असा संदेश मार्गदर्शन करताना दिला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन पोलीस निरीक्षक संदीप वेदपाठक यांनी केले होते.