अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने आज सांगली शहरामध्ये कारवाई करून 45 लाख 25 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी दिली.
विशेष भरारी पथकास मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी स्वामी व पवार यांनी जुने बुधगाव रोड येथील अल्ताफ रमजान मुलाणी यांच्या शेडची तपासणी केली असता, येथे राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच शेडसमोर उभ्या असलेल्या दोन वाहनांमध्येही पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळला. अन्न व औषध प्रशासन, सांगलीच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून 45 लाख 25 हजार 960 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा व 2 वाहने (किंमत 5 लाख 50 हजार रुपये) जप्त करून ताब्यात घेऊन शेड सीलबंद केले. या प्रकरणी पुढील तपासाकरिता शहर पोलीस स्टेशन, सांगली येथे प्रथम खबर अहवाल दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाचे अरविंद कांडेलकर, समुद्रे व सहायक आयुक्त (अन्न) मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी स्वामी व पवार यांनी ही कारवाई केली. जिह्यातील सर्व व्यावसायिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा, विक्री करू नये. तसा साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.