विशेष – गांधीजींचा ‘राम’!

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

सत्य आणि न्यायाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगाने या अखंड भारतभूमीकडे पाहावे, असे वाटणारे महापुरुष महात्मा गांधी, ज्यांच्यासाठी राम आणि रहीम समान होते. खलप्रवृत्तीवर विजय ही रामरायाचा आदर्श मानत रामराज्याची कल्पना प्रत्यक्षात येईल हा दृढ विश्वास त्यांनी दिला. काळ कोणताही असो, ‘राम’ आणि ‘रामायण’ हे कामयच प्रेरणादायी व आदर्शवत राहतील. महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल तर आजही गांधींच्या जीवनमूल्यांची जोपासना करणे अगत्याचे आहे.

भारत हा संतांचा, वीरांचा व महामानवांचा देश आहे. या महामानवांनी समाजाला अन्याय, अज्ञान आणि अंधःकारातून बाहेर काढून महान कार्य केले. या महापुरुषांच्या मालिकेत महात्मा गांधी यांचे नाव अपार श्रद्धेने व आदराने घेतले जाते.

गांधीजींना ‘रामराज्य’ म्हणजेच सत्य आणि न्यायावर आधारित राज्यव्यवस्था आणायची होती. सत्य आणि न्यायाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगाने या अखंड भारतभूमीकडे पाहावे, असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांच्यासाठी राम आणि रहीम हे समान होते आणि ते सत्य आणि सदाचारालाच ईश्वर मानत होते. रामराज्य जे देवाचे राज्य आहे, जिथे सत्य, न्याय आणि शांती नांदते. अशा राम आणि रामराज्याला त्यांनी सत्य, अहिंसा आणि न्यायाचे प्रतीक मानले, त्यांनी आपल्या विचारांमधून आणि कृतीतून त्यांस व्यापक स्वरूप दिले. महात्मा गांधी हे महान संत होते. ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ हे भजन ते आपल्या साबरमती आश्रमात प्रार्थनेच्या वेळी म्हणत असत. नथुराम गोडसे याने गोळी झाडून त्यांची हत्या केली त्या अंतःकाळीसुद्धा त्यांच्या मुखातून ‘हे राम’ हे शब्द आले.

रामजन्माच्या अगोदर आपल्या भारत देशाची परिस्थिती चिंताजनक होती. असूर उन्मत झाले होते. कुंभकर्णासारख्या खलप्रवृत्तीने देशभरात अनीती व अन्याय माजविला होता. अनेकांचे शोषण होत होते. सात्विक वृत्तीचा बिभीषण रावणाच्या राजसभेत अरण्यरुदन करीत होता. मदाने उन्मत्त झालेले असुर त्याचा उपहास करीत होते. रावण आपल्या राज्याच्या दशविध खात्यांनी एकमुखी सत्ता राबवीत होता. निसर्गाच्या सर्व शक्ती व नवग्रहसुद्धा आपल्या अधीन आहेत, अशी त्याची उद्धट भावना होती. तो सत्तांध होता, आपली हुकूमत सर्व रयतेवर राबवीत होता. जगाचा प्रभू ईश्वर आहे की रावण अशी शंका लोकांच्या मनात येत होती. रावण थेट राजसभेतदेखील म्हणत असे की, ‘अनेक शत्रूंना मी ठार मारीन. मी सर्वश्रेष्ठ आहे. मीच सुखोपभोग घेईन. साऱ्या सिद्धी माझ्या दासी आहेत.’ रावणाच्या दहशतवादी आणि हुकूमशाही वृत्तीमुळे संपूर्ण जनता त्रासली होती. त्यामुळे हीनदीन झालेली सर्वसामान्य जनता ईश्वराकडे प्रार्थना करीत होती की, ‘प्रभू, आम्हाला हा अन्याय फार असह्य झाला आहे. आमची मांगल्यावरची श्रद्धा उडाली आहे. साम्राज्यवादी राक्षस असंख्य प्राण्यांचा बळी घेत आहेत. त्यामुळे जगणं अशक्य झालं आहे ही स्थिती कोठवर चालेल प्रभू?’ विधाता म्हणाला, ‘हे वत्सा, श्रद्धा सोडू नकोस. असुरी शक्तीचा ऱ्हास अटळ आहे. साध्याभोळय़ा लोकात, एवढंच नाही तर वानरांमध्येसुद्धा ईश्वरशक्ती प्रगट होईल आणि रावणाचा पराभव होईल.’’ त्यानंतर देशसेवेला वाहून घेणारे ब्रह्मचारी निर्माण झाले. एक पत्नीव्रताने राहणारे सुसंस्कृत व सभ्य पुरुष निर्माण झाले. यज्ञ व देश रक्षणार्थ ऋषीच्या सानिध्यात मुले शिकू लागली. भाऊ-भाऊ अपूर्व प्रेमाने एकमेकांशी बंधुभावाने वागू लागले. ऋषीमुनी आपला अभिमान टाकून प्रजेमध्ये सश्रद्धा निर्माण करू लागले. लोक तपश्चर्या करू लागले.

दशरथ राजानेही तपश्चर्या सुरू केली. धर्माचा अग्नी चेतवला. यज्ञ पुरुषाने पायसरूपी चैतन्य प्रदान केले. जग वाट पाहू लागले. सारे संयोग अनुकूल झाले. पापाची घटका भरली आणि चैत्र शुक्ल नवमी या तिथींला प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. हीच रामनवमी!

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या राजपुत्रांचे बहुविध शिक्षण सुरू झाले. कुलपती वसिष्ठांनी दशरथ राजाच्या राजपुत्रांना शिक्षण देण्याला प्रारंभ केला. क्रांतिदृष्टे विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे आले. त्यांनी यज्ञ रक्षणार्थ रामलक्ष्मणांची निवड केली. दशरथाने मनाचा निश्चय करून मोहवश न होता आपल्या प्राणप्रिय पुत्रांना ऋषीच्या हवाली केले. विश्वामित्र राजपुत्रांना घेऊन प्रवासाला निघाले. प्रवासात विश्वामित्राने त्यांना निसर्गाची ओळख करून दिली. रामलक्ष्मण साऱ्या देशभर फिरले. देशाची परिस्थिती प्रत्यक्षात पाहिली. विश्वामित्राला त्यांनी प्रश्न विचारला, ‘या देशात नद्या वाहत आहेत, इतकी नैसर्गिक विपुलता आहे, डोंगर-दऱ्या नैसर्गिक संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या आहेत, मग इथे एवढी समृद्ध साधनसंपत्ती असतानाही सर्व देशभर जी प्रजा आहे ती भयग्रस्त का आहे?’ विद्यागुरू विश्वामित्राने राम व लक्ष्मणास त्या प्रदेशाचा इतिहास कथन केला व ते म्हणाले, एकेकाळी हा प्रदेश सुखी संपन्न होता, पण नंतर येथे असूर रावणाचे राज्य आले. रावण हा सम्राट असला तरी त्याची राज्ययंत्रणा प्रजाभक्षक आहे. सर्वसामान्य माणसांवर अन्याय व अत्याचार करणारी ही सत्ता मदांध झाली आहे, त्यामुळे सारी प्रजा भयग्रस्त आहे. तेजस्वी युवकांनो हा सगळा त्रास रावणापासून आहे. हा त्रास दूर करण्याचा भार तुमच्या माथ्यावर आहे. राम लक्ष्मणांना विश्वामित्रांनी रघुकुळाची उज्ज्वल परंपरा व कीर्ती सांगितली. राम, लक्ष्मण, सीतेसह वनवासात असताना रावणाने कपट वेश धारण करून सीतेला पळविले. त्यातूनच मारुतीने आपल्या अपार सामर्थ्याने सीतेचा शोध घेतला. अखेर रामरावण युद्ध झाले. रामाने ऐतिहासिक विजय संपादन केला. आजही प्रभू रामचंद्रावर प्रजेचे अपार प्रेम आहे. सारे भारतीय आजही रामरायाचे गुण गातात. संपूर्ण देशभरात रामनवमी मोठय़ा श्रद्धेने व पवित्र भावनेने उत्साहात साजरी केली जाते. रामायण हा ग्रंथ धर्मग्रंथ मानला जातो. सत्तेचा बेधुंद माज चढल्यावर अन्यायी राक्षसी वृत्तींचा कसा नायनाट होतो आणि सर्वसामान्य जनता, इतकेच नव्हे तर न्याय प्रस्थापित करण्यासाठी वानरांसारखे प्राणीदेखील जिवावर उदार होऊन कसे लढतात, हे या रामायणाच्या कथेतून समजते.

रामायणामधून प्रेरणा घेऊन आपल्या राष्ट्राला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करता येईल. या भारतभूमीला समृद्ध, बलवान, कीर्तिवान व आदर्श बनवता येईल आणि दुष्ट प्रवृत्तींची परकीय सत्ता नष्ट करता येईल, असा दृढ विश्वास महात्मा गांधीजींनी भारतीयांना दिला होता. या विश्वासातूनच महात्मा गांधींच्या हाकेला प्रतिसाद देऊन देशभरातील तळागाळातील हजारो अनुयायी स्वातंत्र्य लढय़ात सामील झाले. काहींनी या देशासाठी प्राणार्पण केले. घरादारावर तुळशीपत्र ठेवून हे स्वातंत्र्यवीर प्राणपणाने लढले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. एकवचनी, एकबाणी आणि एकपत्नीव्रताने रामाने बलाढय़ अशा खलप्रवृत्तीवर विजय मिळवला, हाच रामरायाचा आदर्श घालून महात्मा गांधींनी रामराज्याची कल्पना मांडली होती. त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि अमर झाले. या भरतखंडात त्यांच्या कल्पनेतील रामराज्य अवतरावे असे वाटत असेल तर त्यासाठी ‘राम’ आणि ‘रामायण’ हा ग्रंथ प्रेरणादायी व आदर्शवत आहे. मग तो काळ कोणताही असो, महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल तर आजही गांधींच्या जीवनमूल्यांची जोपासना करणे अगत्याचे आहे.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र लोककलेचे अभ्यासक आहेत.)