Zakir Husaain असा उस्ताद होणे नाही…

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जेव्हा तबला या वाद्य प्रकाराचे नाव घेतले जाते तेव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते. आपल्या कलेने त्यांनी तबल्याला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळवून दिली. तबल्यावर त्यांच्या बोटांतून निघणारे सूर दीर्घकाळ रुंजी घालत राहतात. त्यांची तबल्याची थाप ऐकणारा ‘वाह उस्ताद वाह’ म्हटल्याशिवाय राहत नाही. त्यांचे लाखो, करोडो चाहते आहेत. त्यांच्या कलेचा प्रभाव जनमानसावर इतका बिंबला की प्रत्येकाला उस्ताद झाकीर हुसेन बनावे असे वाटते. अगदी लहान मुलेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तबलावादनाकडे वळतात. हिंदुस्थानी कला क्षेत्रातील शिखर सितारा म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या कलावंतांमध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव अग्रणी घ्यावे लागेल. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण, शिक्षण माहीम येथे झाले. माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शिकले. तर महाविद्यालायीन शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झाले. त्यांची संगीत साधनाही माहीम येथून सुरू झाली. लहान असल्यापासून झाकीर हुसेन तालावर डोलत. जे हाती सापडेल ते वाजवायचे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मोठेपणी त्यांचा प्रवास तबलावादनाच्या दिशेने जाण्याचे ते संकेत होते. वडील अल्लारखाँ यांनी तिसऱया वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. त्यांनीच त्यांच्यावर वाद्यांचे संस्कार केले. तेच त्यांचे पहिले गुरू होत. लहान वयात झाकीर यांनी वडिलांना साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम केले.

सातव्या वर्षी पहिली मैफील

झाकीर हुसैन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफल सादर केली. वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला लागले. तबलावादनातील शिखर ठरलेल्या झाकीर यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रविशंकर, शिवकुमार शर्मा आदी श्रेष्ठ गायक, वादकांना साथ दिली. झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलावंतांसोबत, कलाप्रकारांबरोबर तबलावादन केले. मग गिरीजादेवी यांची ठुमरी असो किंवा पंडित भीमसेन जोशी यांचा अभंग किंवा जसराजजी यांचा अभंग. देशातील सर्व प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले. त्यांनी गुरुशिष्य परंपरेला महत्त्व दिले. त्यांचा स्वतःचा मोठा शिष्य परिवार आहे.
शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत

हुसेन यांना 1999 साली यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सने नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली. तेव्हापासून ते हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून ओळखले जायचे. हुसेन यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस 1970 साली प्रारंभ केला. एका वर्षात 150 तबलावादनाचे कार्यक्रम देशविदेशात केले. त्यांनी ग्रुप तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांच्यासोबत शांती (1970), इंग्रजी गिटारवादकर जॉन मॅक्लॉफ्लीन व व्हायोलीनवादक एल. शंकर यांच्यासोबत शक्ती (1975) स्थापन केला. आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलीन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा दिग्गज कलाकरांसोबत सहवादन केले. ‘मास्टर्स ऑफ पर्कशन’ या संकल्पनेद्वारे ते लोकसंगीत वादकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात. अनेक गुणी ज्युनिअर कलावंतांना ते तबल्याची साथ करून प्रोत्साहन देत. यामध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरसिया यांचा समावेश आहे. ते स्वतंत्र तबलावादनाच्या मैफिली करत. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका व ध्ननिफिती आहेत. ते स्टॅनफर्ड विद्यापीठात हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे प्राध्यापक व अभ्यागत प्राध्यापक होते.

त्यांचे कार्य कर्तव्यदक्षतेने पुढे न्यायचेय – महेश काळे

उस्तादजी गेले हे कळलं आहे, पण पटत नाही. इतका मोठा कलाकार दशकांमध्ये होतो. ते आपले शास्त्राrय संगीतातले वाद्य त्याच्या शास्त्राrय परिघापलीकडे नाही, तर भूगोलच्या पलीकडे घेऊन गेले. तबल्याचा उल्लेख झाला की, एक अग्रेसर नाव असते ते झाकीरजींचे असते. त्यांनी पूर्ण जनमानसात तबल्याद्वारे शास्त्राrय संगीत पोहोचवले. असे झाकीरजी आज गेले म्हटल्यावर आम्हाला अचानक पोरके व्हायला होते. कारण त्यांच्याकडेच बघून आपण सगळ्या गोष्टी करतो ना! घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्यावर जसं सुन्न वाटतं, तशी अवस्था आज झालीय. त्यांनी जे काम आतापर्यंत केलंय, ते कर्तव्यदक्ष राहून पुढे कसं नेता येईल याकडे अजून लक्ष द्यायचे एवढंच आपण करू शकतो. हीच परतफेड आपण करू शकतो.

आम्ही सॅन प्रॅन्सिस्को येथे एका गावात राहायचो. आमच्या वरच्यावर भेटी व्हायच्या. ते आग्रहाने जेवायला घेऊन गेले. एकदा त्यांच्या ग्रॅमी नॉमिनेटेड बॅण्डच्या कलाकारांकडे मला हात पकडून घेऊन गेले. माझी ओळख त्या कलाकारांशी करून दिली. हा मुलगा छान गातो. आपल्याच भागातील आहे. इकडं भूषण आहे, असे उद्गार त्यांनी माझ्याबद्दल काढले होते. माझ्यासारख्या कलाकाराला इतक्या मोठय़ा माणसाने इतक्या लोकांसमोर ओळख करून देणं याला वेगळ्या प्रकारची दानत लागते. घोळक्यामध्ये एकांत साधून त्या व्यक्तीला इतर कुणीच नाही, आपणच आहोत, असं वाटावं इतपं चांगल्या पद्धतीने संभाषण त्यांनीच करावे. अशा खूप गोष्टी त्यांच्या आहेत. मी निःशब्द झालोय.

अद्वितीय व्यक्तीमत्त्व – रवी चारी, सतार वादक

उस्ताद झाकीरभाई म्हणजे देवाने पाठवलेले गंधर्व. जागतिक कीर्तीचा महान कलावंत, ज्याने माझ्यासारख्या अनेक कलावंतांना व्यासपीठ दिले, प्रोत्साहन दिले. प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. माझ्या अल्बममध्ये स्वतःचे नाव दिले, अल्बम लाँचदेखील केला. सर्व जॉनरच्या म्युझिकमध्ये ते आनंद घ्यायचे. एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व. असा कलावंत होणे नाही.

मोठा भाऊ सोडून गेला – रोणू मुझूमदार, बासरी वादक

उस्तादजी म्हणजे माझा मोठा भाऊ. त्यांनी मला प्रेमाने रोणूबाबू हे नाव दिले. झाकीरभाईंसोबत मी खूप काम केले. 1996 साली आम्ही ‘हार्ट टू हार्ट’ अल्बमची निर्मिती केली. कोणत्याही कलाकाराला ते लहान समजायचे नाहीत. उलट त्याला मोठा करायचे. त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी आहेत. अमेरिकेत जेव्हा आम्ही दुसरा अल्बम केला तेव्हा माझ्याकडे तानपुरा नव्हता. मात्र उस्तादजी म्हणाले, काही हरकत नाही. मी आणतो तानपुरा. मोठय़ा भावासारखे त्यांनी माझ्यावर प्रेम केले. पृथ्वी थिएटरमध्ये एका कार्यक्रमापूर्वी पाय घसरून माझ्या हाताला लागले. त्या दिवशी मी उस्तादजींना सांगितले की, आज मला बासरी वाजवायला भीती वाटतेय. यावर उस्तादजींनी मला कमालीचा धीर दिला. घाबरू नकोस. मी सांभाळून घेईन, असे ते म्हणाले. कितीतरी आठवणी यानिमित्ताने आज जाग्या झाल्या आहेत. देवदूत आपल्याला सोडून गेला, असेच यानिमित्ताने म्हणेन.

झाकीरभाईंनी प्रसिद्धी पचवली होती. प्रसिद्धी पचवण्यासाठी त्यांना कोणतेही श्रम पडले नाहीत. कारण ते नैसर्गिक होतं. त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी प्रसिद्धी पचवली, असे म्हणता येणार नाही.

समर्पणभावाचा वस्तुपाठ – राहुल देशपांडे, गायक

माझ्याकडे आज शब्द नाहीत. झाकीरजी आपल्याला सोडून गेले. माझं खूप मोठं वैयक्तिक नुकसान झालंय. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून त्यांच्या आयुष्यात ते ज्या पद्धतीने जगले ते माझ्यासारख्या कलाकारासाठी वस्तुपाठ आहे. कसं वागायला पाहिजे, कलेकडे कशा पद्धतीने समर्पणभावनेने बघितले पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांच्या स्मृतीस मनापासून आदरांजली.

तबल्याचा नाद शांत झाला – शंकर महादेवन, शास्त्रीय गायक

माझ्या संगीत प्रवासात झाकीरजींची खूप मोठी साथ आहे. 25 वर्षांपासून आम्ही एकत्र टूर करतोय. देशविदेशात कॉन्सर्ट करतोय. इतकं काम मी अन्य कुठल्याही कलाकारासोबत केलं नाही. आजचा दिवस माझ्यासाठी फारच दुःखाचा आहे. खूप मोठी हानी झाली आहे. झाकीरजींकडून केवळ संगीत नव्हे तर इतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माणूस म्हणून, कलाकार म्हणून कसं असलं पाहिजे हे त्यांनी नकळत शिकवलं. साथसंगत कशी द्यायची, टीम स्पिरिट काय असतं हे वेळोवेळी शिकलो. या सगळ्या बाबतीत त्यांचा आशीर्वाद मला आयुष्यात मिळाला. स्वतःला मी भाग्यवान समजतो. झाकीरजी जिथे जायचे तिथे माझ्याबद्दल चांगलं बोलायचे. त्यांचं बोलणं कायम प्रोत्साहनपर असायचं. मी त्यांच्या ‘मुहाफिज’ सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं. पुढे आम्ही एकत्र फ्यूझन, जॅझ, कनार्टक संगीत, हिंदुस्थानी, गझल, ठुमरी, लावणी, भक्तिगीतं सादर केली. त्यांनी सगळ्या प्रकाराला साथ दिली. असा कलावंत होणे नाही. यंदाचे वर्ष तसं विचित्रच. याच वर्षी आम्ही ग्रॅमी पण घेतलं आणि याच वर्षी ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या तबल्याचा नाद आता ऐकू येणार नाही.

संगीत क्षेत्रातील आविष्कार

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाचं वृत्त मनाला वेदना देणारं आहे. त्यांचं तबलावादन हा संगीत क्षेत्रातील एक अविष्कार होता, शास्त्रीय संगीतासाठी संजीवनी होता. हा आविष्कार प्रत्येक कलारसिक आपल्या हृदयात सदैव जपून ठेवेल, अशा भावना व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली. आदित्य ठाकरे यांनी एक जुना फोटो पोस्ट करत आठवणींनाही उजाळा दिला आहे. या फोटोत झाकीर हुसेन यांच्यासमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे दिसत आहेत.

पाच रुपयांची किंमत मोठी

झाकीर हुसैन 12 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांसोबत एका कॉन्सर्टमध्ये गेले होते. त्या कॉन्सर्टमध्ये पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्लाह खान असे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज आले होते. या संगीत दिग्गजांसोबत झाकीर हुसैन यांचे वडीलही व्यासपीठावर होते. त्यावेळी कॉन्सर्ट संपल्यानंतर झाकीर हुसैन यांना पाच रुपये मिळाले होते. हा किस्सा झाकीर यांनी एका मुलाखतीत सांगितला. त्यानंतर मी मोठी कमाई केली, परंतु ते पाच रुपये आजही माझ्यासाठी अतिशय किमती आहेत, असे त्यांनी सांगितले.

शशी कपूर, शबाना आझमींसोबत अभिनय

झाकीर हुसेन हे अभिनेतेही होते. त्यांनी तब्बल 12 सिनेमांत अभिनय केला. शशी कपूर यांच्यासोबत त्यांनी 1983 मध्ये आलेला ब्रिटिश सिनेमा ‘हिट अॅण्ड डस्ट’ या सिनेमात काम केले. या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच 1997 मध्ये झाकीर हुसेन यांनी ‘साज’ सिनेमात शबाना आझमींसोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात त्यांनी तबला वादक आणि शबाना यांच्या प्रियकराची भूमिका साकारली होती.

अन् पंडित रविशंकर पहिल्यांदा म्हणाले उस्ताद…

झाकीर हुसेन यांना पंडित रविशंकर यांनी पहिल्यांदा उस्ताद म्हटले. याबद्दलचा किस्सा स्वतः झाकीर हुसेन यांनी सांगितला होता. जेव्हा मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. कुणीतरी वर्तमानपत्र घेऊन आले. मी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पंडित रविशंकरजींसोबत कार्यक्रम करत होतो. माझे वडील, उस्ताद अल्ला रखा हेदेखील पुढच्या रांगेत बसले होते. वडिलांनी मंचावर पंडित रविशंकर यांच्यापर्यंत पद्मश्रीची बातमी पोहोचवली आणि त्यांनीही लागलीच मंचावरच माझ्या पद्मश्रीची घोषणा करत पहिल्यांदा मला उस्ताद म्हणून संबोधले हा क्षण माझ्यासाठी अतिशय खास होता, असा किस्सा झाकीर हुसेन यांनी सांगितला होता.

शक्ती नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना

झाकीर हुसैन यांनी पंडित रविशंकर, उस्ताद अमजदअली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉप्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅक्लॉप्लिनसोबत ‘शक्ती’ नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपने हिंदुस्थानी शास्त्राrय संगीत आणि जॅझ एकत्र करून नवीन शैली सादर केली.

व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे पहिले संगीतकार

2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले संगीतकार ठरले.

झाकीर हुसेन यांना तबला वादनातून श्रद्धांजली

गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात लहानग्यांनी तबलावादन करून दिवंगत तबलावादक झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. या मुलांनी तबल्यावर लीलया ताल धरत कला सादर केली. देशभरात अनेक ठिकाणी अशाचप्रकारे तबलावादन करून झाकीर हुसेन यांचा शास्त्राrय संगीताला नवसंजीवनी देणारा कलाविष्कार तसेच त्यांच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.

गाजलेले संगीत अल्बम

  • 1977 फेस टू फेस, शक्ती ग्रुपसह
  • 1987 जेन गार्बरेक, जॉन मॅक्लॉप्लिन आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत
  • 1991 प्लेनेट ड्रम, मिकी हार्टसोबत
  • 1993 साऊंडस्केप- म्युझिक ऑफ द डेजर्ट,

सोलो अल्बम

  • 1994 उस्ताद अमजद अली खान अॅण्ड झाकीर हुसैन- उस्ताद अमजद अली खान यांच्याबरोबर
  • 1995 रिमेंबरिंग शक्ती – मॅक्लॉप्लिन, उप्पलपु श्रीनिवास, वी. सेल्वागणेश आणि शंकर महादेवन
  • 1998 साज – फिल्म अल्बम
  • 2002 द ट्री ऑफरिदम, उस्ताद अल्लारखाँ, तौफिक कुरेशी आणि फजर कुरैशी
  • 2007 ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट – मिकी हार्ट, इमरान हुसैन, चंदन शर्मा, सिकिरू अडिपोजू, जियोवानी हिडालगो
  • 2023 अॅज व्ही स्पीक- बेला प्लेक, एडगर मेयर आणि राकेश चौरसिया

विविध अनेक सन्मान

  • 1990 संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • 1990 इंडो-अमेरिकन सन्मान
  • 2006 मध्य प्रदेश सरकारच्या वतीने कालिदास गौरव
  • 2012 कोणार्क नाट्य मंडपच्या वतीने गुरू गंगाधर प्रधान जीवनगौरव
  • 2019 संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न पुरस्कार
  • 2022 मुंबई विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी